Onion price crash Pudhari photo
नाशिक

Onion price crash | कांदा 50 पैसे प्रतिकिलो, जिल्ह्यात कांदा मातिमोल

मनमाडला एक रुपया ८०

पुढारी वृत्तसेवा

मनमाड : सुरगाणा, मनमाड, लासलगावससह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी (दि. ८) कांदा भावात मोठी घसरण होत प्रतिक्विंटल कमीत कमी ३०० ते ४००, तर जास्तीत जास्त ८०० ते १००० हजार रुपये दर मिळाला. सुरगाणा येथे लहान कांद्याला प्रतिकिलो अवघा ५० पैसे, तर मनमाडला १ रुपया दर मिळाला.

कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्येही उन्हाळ कांदा सरासरी हजार रुपये म्हणजेच दहा रुपये किलो दर विक्री झाला. कष्टाने पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून मनमाडला शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेला कांदा फेकून संताप व्यक्त केला.

नाशिक जिल्हा कांदा, द्राक्षे, डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. कांदा हे नगदी पीक मानले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कांद्याबाबत केंद्र शासनाच्या धरसोड धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या चांगल्या कांद्याला प्रतिक्विटल ३०० ते ४०० रुपये, तर जास्तीत जास्त ८०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. एक एकर कांदा लागवडीला सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च होतो.

मात्र, आज जे भाव मिळत आहे, त्यात लागवडीवर केलेला खर्चदेखील निघत नसल्याने भाव वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. मात्र, यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सूर्य आग ओकू लागला. एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात मोठी वाढ होऊन पारा ४० अंशांच्या पुढे गेला.

वाढत्या तापमानाचा फटका शेतात उभी असलेल्या पिकांसह चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला बसत आहे. हजारो क्विंटल कांदा सडू लागल्यामुळे हवालदिल झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वरुडी येथील शेतकरी प्रकाश गलधर यांनी २५ गोणी म्हणजे १ हजार २६२ किलो कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला. पण त्यांना बाजारात अवघा एक रुपया दर मिळाल्याने त्यांना मिळालेल्या पैशांपेक्षा हमाली, तोलाई, वराई, गोणी खर्च आणि इतर कपातींचा खर्चच अधिक झाल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT