

नाशिक : जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य, वित्त आणि पशुसंवर्धन या विभागातील कर्मचारी बदली प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या बदल्यांचे वेळापत्रक प्रशासनाने निश्चित केले आहे. मंगळवारी (दि.१२) एकाच दिवशी या तिन्ही विभागांतील कर्मचाऱ्यांच्या समुपदेशन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवली जाणार आहे. १६ ते २५ मे दरम्यान तालुकास्तरावर बदली प्रक्रिया राबवण्यात येईल. याबाबतचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी काढले आहे.
दरवर्षी मे महिन्यात कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवली जाते. मात्र, यंदा जनगणना प्रक्रियेचे कामकाज सुरू झाले. यात प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर जबाबदारी दिलेली आहे. याच दरम्यान केंद्राच्या गृहविभागाने दिलेल्या पत्रात जनगणनेचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावे, असे निर्देश दिले. परंतु, जि. प. कर्मचारी बदली प्रक्रिया ही राज्याच्या ग्रामविकास विभागांतर्गत असल्याने संभ्रम तयार झाला.
गत महिन्यात ग्रामविकास विभागानेही पत्र काढत कर्मचाऱ्यांवर जनगणनेची जबाबदारी असल्याने बदली प्रक्रिया राबवू नये, असे निर्देश दिले. या पत्रानंतर बदल्या होणार नसल्याचे चित्र होते. परंतु, जि. प.च्या शिक्षकांव्यातिरिक्त इतरांना जनगणनेचे काम नाही, त्यामुळे प्रशासनाने जनगणनेचे काम न सोपवलेल्या पशुसंवर्धन, वित्त आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निश्चित केले. त्यानुसार प्रशासनाने बदल्यांचे पत्र काढले.
जनगणनेच्या कामाशी संबंधित गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवण्यात येऊ नये, असा निर्णय शासनाचा आहे. ज्या संवर्गाच्या आस्थापनेवरील एकही कर्मचाऱ्यांची जनगणनेसाठी नियुक्ती नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या क्रमप्राप्त असल्याने प्रक्रिया राबवावी, असे पत्रात म्हटले आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात मंगळवारी ही प्रक्रिया राबवली जाईल.
असे आहे बदल्यांचे वेळापत्रक
११.३० ते १२.३०
कनिष्ठ लेखा अधिकारी
सहायक पशुधन विकास अधिकारी
पशुधन पर्यवेक्षक
१२.३० ते १.३०
कृष्ठरोग तंत्रज्ञ
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
औषधनिर्माण अधिकारी
२.३० ते ५.३०
आरोग्य पर्यवेक्षक
आरोग्य सहायक
आरोग्य सहायिका
आरोग्यसेविका