Onion Pudhari File Photo
नाशिक

Onion Price | दिल्लीला बफर स्टॉक पाठविल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान; तीन दिवसांत कांदा दरात 450 रुपयांची घसरण

लासलगाव - निफाडमध्येच सॉर्टिंगअभावी कांदा लोडिंगला ब्रेक

पुढारी वृत्तसेवा

लासलगाव : राकेश बोराऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या दराने साठीचा टप्पा ओलांडल्यानंतर केंद्र सरकारची धावपळ सुरू झाली आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी केलेला कांदा लासलगाव व मनमाड रेल्वेस्थानकातून दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरांकडे पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खरेदी केलेल्या कांद्याचे अद्याप ग्रेडिंग आणि सॉर्टिंग पूर्ण झालेले नसल्याने लासलगाव आणि निफाड परिसरातून कांदा लोडिंगला अडथळा निर्माण झाला आहे.

कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही संस्थांना खरेदी केलेल्या कांद्याचे तातडीने सॉर्टिंग करून निकास करण्याचे आदेश दिले आहेत. सणासुदीच्या काळात बाजारात मुबलक कांदा उपलब्ध करून देऊन ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारचा असला, तरी प्रत्यक्षात सॉर्टिंग आणि लोडिंग प्रक्रियेत निर्माण झालेल्या दिरंगाईमुळे या प्रयत्नांनाच खीळ बसत असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने २०२६-२७ च्या किंमत स्थिरीकरण निधींतर्गत दोन लाख मेट्रिक टन कांदा बफर स्टॉकसाठी खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे १.२१ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला आहे. हा कांदा दिल्लीसह चेन्नई, कोलकाता, अर्नाकुलम, गुवाहाटी, वाराणसी, लखनऊ, पाटणा, चंदीगड, जम्मू आणि अमृतसर या प्रमुख ग्राहक केंद्रांमध्ये रेल्वे तसेच रस्त्यामार्गे पाठवण्याचे नियोजन आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला किमान १,०००, कमाल ४,२००, तर सरासरी ३,७५१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजारात कांद्याची आवक आणि दराची स्थिती लक्षात घेता, केंद्राच्या बफर स्टॉकमधून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, एकीकडे ग्राहकांना स्वस्त कांदा देण्याच्या नादात दुसरीकडे स्थानिक बाजार समित्यांमध्ये दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खरेदी केलेल्या बफर स्टॉकमधील ४५३ मेट्रिक टन कांदा लासलगाव येथून दिल्लीला पाठविला. दिल्लीमध्ये हा कांदा ३५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणार असताना, त्याचा थेट परिणाम कांद्याचे आगार म्हणून ओळख असणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारावर झाल्याचे चित्र आहे.

सोमवारच्या तुलनेत मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी कांद्याच्या दरात टप्प्याटप्प्याने घसरण झाली. अवघ्या तीन दिवसांत कांद्याच्या दरात एकूण ४५० रुपयांची घट झाल्यामुळे त्याचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. लासलगाव मुख्य बाजारासह उपबाजार विंचूर आणि निफाड येथे विक्रीसाठी आलेल्या ७५ हजार ३३४ क्विंटल कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे सुमारे २ कोटी ७६ लाख ९२ हजार २५० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख १५ कांदा बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांचे अंदाजे १० ते १२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ग्राहकांना दिलासा देताना शेतकऱ्यांच्या दराचे संतुलनही राखावे, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT