मालेगाव : कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी मालेगाव-सुरत महामार्गावरील सावतावाडी येथे रास्ता रोको करताना शेतकरी. (छाया : रईस शेख)
नाशिक

Onion News : हमीभावासाठी रास्ता रोको; कांदा बातमी वाचा एका Click वर...

कांदा उत्पादकांचा मालेगाव जिल्ह्यातील सावतावाडीत रास्ता रोको

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव (नाशिक) : कांद्याला हमीभाव मिळावा, कांदा निर्यात तात्काळ सुरू करावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी यांसह विविध मागण्यांसाठी कजवाडेसह परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. २०) सामाजिक कार्यकर्ते सागर भामरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव-सुरत महामार्गावरील सावतावाडी येथे महादेव मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन केले.

चालू हंगामात कांद्याचे दर उत्पादनखर्चापेक्षाही कमी मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच सततच्या दरघटीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. चाळीत साठवलेला कांदा सडत असून शेतकरी मोठ्या संकटात आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी कांद्याला किमान हमीभाव जाहीर करावा, कांदा निर्यात त्वरित सुरू करावी, कर्जमाफी करावी, सडलेल्या कांद्यासाठी नुकसानभरपाई द्यावी आणि कांद्याला आधारभूत किंमत घोषित करावी अशा मागण्या केल्या.

यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी लवकरच कांद्याला हमीभाव न दिल्यास धुळे-मुंबई महामार्ग रोखू, असा इशाराही दिला. या आंदोलनावेळी तहसीलदार विशाल सोनवणे आणि वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात ज्ञानेश्वर कापडणीस, सुनील शेवाळे, कैलास कापडणीस, एकनाथ कापडणीस, प्रविण कदम, मोहन जाधव, मुरलीधर कापडणीस, किरण कापडणीस, अनिल भदाणे, उमा सूर्यवंशी, सोनू शिरसाठ, नंदकिशोर कापडणीस यांच्यासह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या भावना व्यक्त करताना सागर भामरे म्हणाले, गेल्या आठ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी योग्य दराच्या प्रतीक्षेत आहेत. चाळीत सडणारा कांदा पाहून शेतकऱ्यांच्या आशा मावळत आहेत. शासनाने तातडीने निर्यात सुरू करून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून द्यावेत.

एरंडगाव : नाशिक- छत्रपती संभाजी नगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करतांना प्रहार शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते व शेतकरी.

कांदाप्रश्नी एरंडगावला रास्तारोको

दीड तास वाहतुकीचा खोळंबा : शेतकऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी द्या

येवला (नाशिक) : तालुक्यातील एरंडगाव येथे सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एरंडगाव येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकींचा मोठा खोळंबा झाला होता. यावेळी आंदोलकांनी डोक्याला काळे रुमाल बांधून तसेच गळ्यात कांद्याच्या माळा घालत केंद्र सरकारचा निषेध केला.

गेल्या महिन्याभरात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. त्यातच सरकारने कांदा निर्यातीवर लादलेले निर्बंध व अतिवृष्टीमुळे कांद्यावर वाढणारी रोगराई यामुळे उत्पादक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे केंद्राने कांदा निर्बंधमुक्त योग्य भाव द्यावा अशी मागणी करण्यात आली तसेच मागणी मान्य करणार नसाल तर शेतकऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केली आहे. तसेच जूनपासून विकलेल्या कांद्यावर पाचशे रुपये अनुदान द्यावे. सर्वच शेतमालाला हभीभाव द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रमुख मागण्यासाठी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, छावा संघटनेचे गोरख संत, तसेच तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन, अमोल तळेकर, जनार्दन गोडसे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण चरमळ, रशीद पटेल, कचरू उराडे, सुनील पाचपुते, भाऊसाहेब झांबरे, बबन पिंगट, काका पडोळ, शिवाजी खापरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

होर्डिंगने वेधले लक्ष

आंदोलनस्थळी आंदोलकांनी जीसीबीवर बांधलेल्या हार्डिंगला कांद्याच्या माळा घालून मोदी साहेब कांदाला भाव द्या नाहीतर. शेतकऱ्यांना इच्छा मरणाची परवानगी द्या या ओळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शेतकरी गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून निषेध व्यक्त केला.

वला : तालुक्यातील तांदुळवाडी येथील भुलक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या कांदा साठवणूक केंद्राची माहिती घेताना केंद्रीय कृषी मंत्रालयाचे पथक.

केंद्रीय पथकाने घेतली कांदा लागवडीची माहिती

येवला (नाशिक) : केंद्रीय कल्याण विभागाचे पथक व नाशिक कृषी विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन कांदा लागवड क्षेत्राची व साठवणुकीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी केंद्रीय कल्याण पथकाने आंबेगाव येथील शेतकरी आनंदा गिते यांच्या कांदा लागवड क्षेत्रास भेट देऊन लागवड पद्धती, कांदा क्षेत्र, उत्पादन खर्च, साठविलेला शिल्लक कांदा, खरीप हंगामात संभाव्य होणारी लागवड व उन्हाळ कांद्याचे अपेक्षित उत्पादन, बाजारभाव याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेत शेतकऱ्यांच्या समस्या बाबत सविस्तर चर्चा केली.

तांदुळवाडी येथील भुलक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या कांदा साठवणूक केंद्रास भेट देऊन कंपनीचे अध्यक्ष संचालक व सभासद यांच्याशी कांदा उत्पादन साठवणूक व विक्री व्यवस्थेबाबत माहिती घेऊन कंपनीचे कामकाज विषयी माहिती जाणून घेतली, भविष्यात कांदा बाजारभावात ,बाजारभाव निर्यात धोरण ठरविण्यासाठी सदर दौऱ्याच्या आयोजन करण्यात आलेले होते. या पथकामध्ये केंद्रीय कृषी मंत्रालयातील सुचित्रा यादव, रवींद्र कुमार मनोजकुमार, सुजय पांडे, रवींद्र माने, यांचा समावेश होता. यावेळी तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, एकनाथ बडाख, मंडळ कृषि अधिकारी पाटोदा, हरिचंद्रे उपकृषी अधिकारी पाटोदा, सौरभ शिंदे, ऋतुराज जगताप, राम निंबाळकर, संचालक डॉ. नंदकिशोर शिंदे, संचालक विश्वंभर पाटील, मल्हारी जाधव तसेच तांदुळवाडी व खैरगव्हाण येथिल कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT