

देवळा (नाशिक) : कांद्याचे दर कोसळल्याने उमराणे परिसरात शुक्रवारी (दि. १९) रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी ‘नाफेड’चा कांदा भरलेले ट्रक अडवल्याने खळबळ उडाली.
एक किलो कांद्याचा उत्पादनखर्च १७ ते २० रुपये असताना, आजघडीला केवळ सात ते आठ रुपये बाजारभाव मिळत आहे. यास शासनाने स्टॉक केलेला कांदा बाजारात आल्याचेही कारण असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. यातच शुक्रवारी (दि.19) उमराणे शिवारातून ‘नाफेड’चा कांदा लासलगावला पाठविण्यासाठी ट्रक निघाले असताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवले व ट्रकचालकांना शाल-श्रीफळ देऊन गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदवला.
शनिवारपासून (दि.20 सर्व ट्रान्सपोर्ट मालक व चालक यांनी ‘नाफेड’च्या कांद्याची वाहतूक करु नये, अशी विनंती यावेळी करण्यात आली. शिवाय, असे ट्रक आढळल्यास ते पेटवून देण्याचा इशारादेखील रयत क्रांती शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, स्व. शरद जोशी शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष मयूर नेरकर आदींनी दिला आहे.