नाशिक : सफाई ठेक्याची दुसरी निविदाही वादग्रस्त ठरल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने तिसऱ्यांदा नव्याने निविदा प्रसिद्ध केली. महासभेच्या निर्णयानुसार २३७ कोटींच्या ठेक्यात १३४ कोटींची कपात करत १०३ कोटींचा ठेका दिला जाणार आहे. या अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर ८७५ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती तीन वर्षे मुदतीसाठी केली जाणार आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे महापालिकेने २०२० मध्ये रस्ते सफाईसाठी बाह्यस्रोतांद्वारे ७०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर केली होती. या कामाचा ठेका २०२३ मध्ये संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने नवीन निविदा प्रक्रिया होईपर्यंत जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली.
नाशिक पूर्व, नाशिक पश्चिमसह गोदाघाट स्वच्छतेसाठी ८७५ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी १७६ कोटींची पहिली निविदा काढली होती. मात्र विशिष्ट ठेकेदारासाठी या निविदा प्रक्रियेत अटी- शर्तींचा समावेश केला गेल्याचा तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केले गेल्याचा आरोप करीत जुन्या ठेकेदाराने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने महापालिकेने ही निविदा रद्द करत दुसऱ्यांदा २३७ कोटींची निविदा मागविली होती. मात्र यातही अनागोंदी झाल्याची तक्रार करत जुन्या ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्यानंतर महापालिकेने तिसऱ्यांदा नव्याने निविदा मागविल्या आहेत. यात ठेक्याची मुदत पाच वर्षांवरून तीन वर्षे मुदतीसाठी करण्यात आली असून, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही १,१७५ वरून ८७५ करण्यात आली आहे.
नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम विभाग तसेच पूर्व विभागातील गोदावरी घाट, गौरी पटांगण, अहिल्याबाई होळकर पूल ते कपिला संगम तसेच नाशिक पूर्व विभागातील महापालिकेच्या सर्व शाळांमधील शौचालये, आस्थापना, विभागीय कार्यालये, मनपाची नाट्यगृहे, सभागृहे, संपूर्ण नाशिक पश्चिम विभागाकडील पंचवटीलगतचा व घाटालगतचा भाग अशा विविध ठिकाणांची साफसफाई व स्वच्छता ठेकेदारामार्फत केली जाणार आहे.