Nashik Municipal Corporation Recruitment
नाशिक : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे तांत्रिक संवर्गातील १४० पदांची भरतीही बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भरतीसंदर्भात बिंदुनामावलीचा प्रस्तावही गेल्या चार महिन्यांपासून शासनाच्या लालफितीत अडकला आहे.
कोरोना महामारीच्या काळात महापालिकेला मनुष्यबळाअभावी अनेक अडचणी, तसेच समस्यांचा सामना करावा लागला होता. महापालिकेने केलेल्या मागणीनुसार शासनाने मनपातील अग्निशमन विभाग, आरोग्य वैद्यकीय, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी २०२३ मध्ये जवळपास साडेसहाशेहून अधिक पदांची भरती करण्यास मंजुरी दिली होती. आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची अट शिथिल करत वर्षभरात भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शासनाने दिलेल्या एका वर्षाची अट संपुष्टात आल्याने गेल्या दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया लटकली होती. त्यावर नाशिक महापालिकेने औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेला भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर महापालिकेला शासनाच्या नगरविकास विभागाचे गेल्या ४ फेब्रुवारी रोजी पत्र प्राप्त झाले होते. त्याअंतर्गत विविध विभागांतील सरळसेवेने पदे भरण्याकरिता आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथिल केल्याचे नमूद करण्यात आले होते. शासनाच्या या पत्रामुळे मनपाच्या नोकरभरतीचे दरवाजे खुले झाले.
नव्या आदेशात भरतीप्रक्रिया राबविण्याकरिता कोणतीही मुदत घालून दिलेली नसल्याने महापालिकेची भरती होणारच, अशी अटकळ बांधली गेली होती. त्यानुसार मनपाला तांत्रिक मनुष्यबळासाठी १४० रिक्तपदांची भरती करता येण्याचा मार्ग खुला झाला. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने प्रभागरचना हद्द निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने मनपाची भरतीप्रक्रिया पुन्हा बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पदांसाठी होणार होती भरती
उपअभियंता (स्थापत्य)- ८, उपअभियंता (यांत्रिकी)- ३, उपअभियंता (विद्युत)- २, उपअभियंता (ॲटो)-१, सहायक अभियंता (वाहतूक)- १, सहायक अभियंता (विद्युत)- ३, कनिष्ठ अभियंता (विद्युत)- ७, सहायक अभियंता (स्थापत्य)- २१, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- ४६, सहायक अभियंता (यांत्रिकी)- ४, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- ९, कनिष्ठ अभियंता (वाहतूक)- ३, सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- २८, सहायक कनिष्ठ अभियंता (विद्युत)- ४.