नाशिक : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या अर्ज प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे. पेरू, लिंबू, द्राक्ष, चिकू या पिकांसाठी ३० जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश आल्याने शेतकऱ्यांना वाढीव मुदतीत आता विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.
राज्य सरकारने यंदा हवामान आधारित फळपीक विमा योजना आठ प्रमुख फळपिकांसाठी लागू केली आहे. यामध्ये पेरू, लिंबू, द्राक्ष, चिकू, डाळिंब, सीताफळ या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. फळपीक विमा योजनेत कमी पाऊस, जास्त पाऊस, पावसातील खंड, जास्त आर्द्रता या सारख्या हवामान घटक यांचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. यासोबतच यंदा या योजनेत सहभागी होण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे आवश्यक आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करताना ॲग्रिस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन उतारा, जिओ टॅग फोटो, ई-पीक पाहणी असणे बंधनकारक आहे. पेरू, लिंबू, द्राक्ष, चिकू, डाळिंब, सीताफळ फळबागांचा विमा उतरविण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल सुरू आहे. सहा पिकांसाठी ३० जूनची मुदत आहे, अन्य पिकांसाठी १४ व ३१ जुलै मुदत आहे.
विमा भरण्यासाठी मुदत वाढविली आहे. अर्ज करताना ई-पीक पाहणी, फार्मर आयडी अनिवार्य असून, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.
अभिमन्यू काशीद , जिल्हा अधीक्षक कृषी
मोसंबी - १ लाख
पेरू - ७० हजार
चिकू - ७० हजार
डाळिंब - १ लाख ६० हजार
लिंबू - ८० हजार
सीताफळ - ७० हजार
द्राक्ष - ३ लाख ८० हजार