नाशिक : तांत्रिक अडचणींचे कारण देत नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिक पूर्व विभागीय कार्यालयांसह फाळके स्मारक व लेखानगर भागात ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणीचा निर्णय महापालिकेने रद्द केला आहे. या जागांऐवजी आता अन्य पाच जागांवर ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. या जागा बदलास महासभेची मंजुरी घेण्यात आली आहे.
शासनाच्या ईलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमांतर्गत नाशिक शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी शासनाकडून दहा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून २० ठिकाणी ई-चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महापालिकेने 'सर्वोटेक पॉवर सिस्टिम लिमिटेड' या कंपनीला कंत्राट दिले आहे.
पहिल्या टप्प्यात मुख्यालय राजीव गांधी भवन, पश्चिम विभागीय कार्यालय, पूर्व विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, अमरधाम फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडीअम सिडको, बिटको हॉस्पीटल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर महापालिकेची जागा, अंबड लिंकरोडवरील महापालिका मैदान या २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्सची उभारणी केली जाणार होती. यापैकी महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, प्रमोद महाजन उद्यान, कृषी नगर जॉगिंग ट्रॅक, सातपूर विभागीय कार्यालय, महात्मा नगर क्रिकेट मैदान या पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावर चार्जिंग स्टेशन सुरु झाले आहेत.
उर्वरित १५ पैकी नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिक पूर्व विभागीय कार्यालयांसह फाळके स्मारक व लेखानगर या पाच ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे चार्जिंग स्टेशन उभारणीचा निर्णय रद्द करावा लागला आहे.
मनपा क्रिडांगण शिवनगर, पंचवटी, मनपा मोकळी जागा, जेलरोड, नाशिकरोड, काळेनगर जॉगिंग ट्रॅक, पाईपलाईनरोड, सातपूर, गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक, नवीन नाशिक, व गाडेकरमळा जाँगिंग ट्रॅक, आर्टिलरी रोड, नाशिकरोड या पाच पर्यायी जागांवर चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे.