पिंपळगाव बसवंत (नाशिक) : राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांसाठीची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग होणार असून यामध्ये निफाड तालुक्यातील १३५ गावांतील ६४ हजार ६३८ शेतकऱ्यांसाठी सुमारे ४७ कोटी ७१ लाख ६१ हजार रूपयांची मदत मिळणार असल्याची माहिती निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
निफाड तालुक्यात दि. ६ मेपासून पडणाऱ्या सततच्या पावसाने खरीप हंगामासह द्राक्ष, डाळींब या फळ पिकांसह इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात दि. २७ सप्टेंबरला तालुक्यातील १३५ गावांमध्ये अतिवृष्टी होऊन कोरडवाहु पिकांचे ३ हेक्टरच्या मर्यादेत ४२ हजार ८५३ शेतकऱ्यांचे २६५१३.२८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. भाजीपाला व इतर बागायत पिकांचे ३ हेक्टरच्या मर्यादेत ५ हजार ०५३ शेतकऱ्यांचे २१३७.९३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. तर फळपिकांचे ३ हेक्टरच्या मर्यादेत १६ हजार ७३२ शेतकऱ्यांचे ९५७५.७१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. याप्रमाणे निफाड तालुक्यातील सर्वच १३५ गावांमधील ६४ हजार ६३८ शेतकऱ्यांचे एकुण ३८२२६.९२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुक्यांच्या यादीत निफाड तालुक्याचाही समावेश केला.
त्यानुसार निफाड तालुक्यातील सर्वच १३५ गावांमधील एकुण ६४ हजार ६३८ बाधित शेतकऱ्यांच्या ३८२२६.९२ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून एकुण रु.४७ कोटी ७१ लाख ६१ हजार १६५ इतका निधी मंजूर केलेला आहे.
बाधित शेतकऱ्यांच्या विहित नमुन्यातील माहिती याद्या निफाड तहसिल कार्यालयातून शासनाच्या संगणकीय प्रणालीवर भरण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला आहे, त्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात शासन मदत वितरीत करण्यात येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यांची केवायसी झाल्या/केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यावर शासन मदत वितरीत केली जाणार आहे.
निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन मदत थेट बँक खात्यात वितरीत होणार असल्याने आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा व राज्य आपत्ती मंत्री गिरीष महाजन यांचे व शासनाचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निफाड तालुक्यातील विहित कालावधीत बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करुन शासनास माहिती पाठविलेल्या संबंधित प्रातांधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार विशाल नाईकवाडे, तालुका कृषि अधिकारी सुधाकर पवार, गटविकास अधिकारी नम्रता जगताप व गावनिहाय नेमणूक केलेले पंचनामा पालक अधिकारी यांचे आभार मानले आहे.