

चांदवड (नाशिक) : सुनिल थोरे
हातातोंडाशी आलेल्या पिकाचे सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात १०० टक्के नुकसान झाले. या नुकसानीचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत आर्थिक मदत जाहीर केली खरी, मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना १२००, १५०० व १७०० रुपये अशी तुटपुंजी आर्थिक मदत मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुटपुंजी मदत करून सरकार शेतकऱ्यांची कुचेष्टा करीत असून मिळालेली रक्कम पुन्हा राज्य शासनाला जमा करण्याचा निर्णय तालुक्यातील नारायणगाव, भोयेगाव शेतकऱ्यांनी केला आहे.
मागील सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका खरीप हंगामातील कांदा, मका, सोयाबीन व भाजीपाला पिकाला बसला. या नुकसानीचे गांभीर्य ओळखून आमदार डॉ. राहुल आहेर यांनी तत्काळ अधिकाऱ्यांसह तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करीत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. १०० टक्के पिकांचे नुकसान असल्याने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्ष पंचनामे करताना पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. त्यांनी नुकसानीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात न घेता चुकीचे पंचनामे केल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून अत्यल्प स्वरुपाची मदत मिळत आहे. ही मदतीची रक्कम बघून शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे.
शासनाने ऐन दिवाळीत नुकसानीची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्याने दिवाळी गोड करू असा विश्वास शेतकऱ्यांना होता. मात्र शासनाकडून मिळालेली रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे पाहून राज्य शासनाने शेतकऱ्यांची कुचेष्टा केल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. राज्य शासनाची मिळालेली मदत शेतकरी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना परत करणार आहे.
तालुक्यातील नारायणगाव, भोयेगाव येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत कमी मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गावच्या पंचनाम्यांची माहिती तहसीलदारांकडून मागवली आहे. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय व त्यांच्या हक्काचे पैसे नक्कीच मिळवून देईल. चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
डॉ. राहुल आहेर, आमदार.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीत माझे एक हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने सोयाबीनला कोंब आले होते. शासनाकडून दोन पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र शासनाकडून खात्यात फक्त १७०० रुपये जमा झाले आहे. ही तुटपुंजी मदत करीत शासनाने शेतकऱ्यांची कुचेष्टा केली आहे.
गोरख मांदळे, शेतकरी, नारायणगाव.
तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांनी केले आहेत. पंचानाम्यांचा अहवाल संबंधित यंत्रणेकडून मागवला आहे. तो बघितल्यावरच खरी काय ती वस्तुस्थिती लक्षात येईल.
मंदार कुलकर्णी, तहसीलदार.