Ncmc Card Recharge Pudhari
नाशिक

MSRTC NCMC Card | एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! 2 ऑक्टोबरपासून सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड अनिवार्य

MSRTC NCMC Card | ज्येष्ठ नागरिक, 'अमृत ज्येष्ठ नागरिक', महिला प्रवाशांना २ ऑक्टोबरपासून कार्डद्वारेच सवलत

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांसाठी आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. येत्या २ ऑक्टोबर २०२६ पासून सवलतीचे तिकीट 'एनसीएमसी' कार्डद्वारेच वितरीत केले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.

एसटी महामंडळाकडून शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. यामध्ये 'अमृत ज्येष्ठ नागरिक', ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतींचा समावेश आहे.

या सवलतींच्या प्रवासाचे अधिक सुलभ व डिजिटल पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी 'एनसीएमसी' कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. २ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट 'एनसीएमसी' कार्डमधूनच वितरीत केले जाणार असल्याने संबंधित प्रवाशांनी प्रवासापूर्वी 'एनसीएमसी' कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.

ज्यांच्याकडे कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची क्यूआर कोड असलेली पावती आहे, अशा प्रवाशांनाच सवलतीचा लाभ मिळणार आहे. विशेषतः 'अमृत ज्येष्ठ नागरिक', ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी 'एनसीएमसी' कार्डची नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्यूआर कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे.

ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत प्रवाशांनी 'एनसीएमसी' कार्ड ॲक्टिव्ह करून घेणे आवश्यक आहे. 'एनसीएमसी' कार्ड नोंदणी व वितरणासाठी 'ई-व्हिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड' यांची एसटी बसस्थानक व आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर एनसीएमसी कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी कार्ड नोंदणीची प्रक्रिया आगाऊ पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

पडताळणी करणे सुलभ होणार:

कार्ड मिळाल्यानंतर त्याची सक्रियता, आवश्यक टॉपअप आणि नोंदणीशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. डिजिटल पद्धतीमुळे सवलतीच्या प्रवासाचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार असून, प्रवाशांच्या सवलतीची पडताळणीही ईटीएम मशीनद्वारे सुलभपणे करता येणार आहे. त्यामुळे संबंधित सवलतधारकांनी नवीन नियमाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT