राष्ट्रीय आरोग्य अभियान Pudhari News Network
नाशिक

National Health Mission Nashik | राष्ट्रीय आरोग्य अभियानात नाशिकची पिछाडी

पुढारी विशेष ! सांगली प्रथम तर बृहन्मुंबई शेवटच्या स्थानावर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागरी क्षेत्रात महापालिकांच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा- सुविधांच्या मूल्यमापनात किंचित सुधारणांपलिकडे नाशिकची कामगिरी सुमार दर्जाची राहिली आहे.

राज्यातील २७ महापालिकांच्या तुलनेत आरोग्य कार्यक्रमांच्या मार्च महिन्यातील रँकींगमध्ये नाशिक महापालिका १७ व्या स्थानावर आहे. सांगलीने पिंपरी चिंचवडला मागे सारत पहिल्या क्रमांकावर मजल मारली आहे. तर, पिंपरी चिंचवडची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. नवी मुंबई मात्र, तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल आरोग्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ, राष्ट्रीय बाल स्वास्थ, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, एनपीसीडीसीएस, डेंग्यूसह साथरोग नियंत्रण, एनयुएचएम अशा विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. या माध्यमातून रुग्णांसह, गरजुंना आरोग्यसेवा पुरविली जाते. राज्य शासनाच्या आरोग्य सेवा विभागामार्फत महापलिका क्षेत्रांत पुरविल्या जाणाऱ्या या सेवांचे दरमहा मूल्यमापन केले जाते. शासनामार्फत पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचतात किंवा नाही, यातील कोणत्या सेवा महापालिकांच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक देण्यात आल्या, कोणत्या सेवा देण्यात महापालिका अपयशी ठरल्या, याचे विवेचन केले जाते. रुग्णालय, आरोग्यवर्धिनी, रुग्ण कल्याण समितीच्या कार्याचेही यात मूल्यमापन करण्यात येते. या मूल्यमापनाद्वारे राज्यातील २७ महापालिकांचे रँकींग करून जबाबदारी निश्चित केली जाते. मार्च महिन्यातील कामकाजाचा मूल्यमापन अहवाल शासनाने जाहीर केला आहे. यात फेब्रुवारीत २३व्या स्थानावर असलेली नाशिक महापालिका किंचित वर सरकत १७व्या स्थानावर पोहोचली आहे. दुसऱ्या क्रमांकावरील सांगली महापालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर पहिल्या क्रमांवरील पिंपरी चिंचवड महापालिका दुसऱ्या स्थानावर घसरली आहे. नवी मुंबई महापालिकेचे तिसरे स्थान कायम आहे. कोल्हापूर चौथ्या तर अहिल्यानगर महापालिका पाचव्या स्थानावर आहे.

नाशिकला अवघे 34.60 टक्के गुण

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांचे मूल्यामापन करताना ४०० गुण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार परिक्षण करण्यात येते. आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीत नाशिक महापालिकेला ४०० पैकी जेमतेम १५३.५० गुण मिळाले आहेत. फेब्रुवारीत महापालिकेला २८.९७ टक्के गुण मिळाले होते.

नाशिक पिछाडीमागील कारणे अशी

रेबिज कंट्रोल प्रोग्राम, एनटीसीपी, एनएमएचपी, एनपीसीडीसीएस, एनपीसीएस, काया या गटात नाशिक महापालिकेला शून्य गुण आहेत. ई- औषधी, पीसीपीएनडीटी, आरसीएच पोर्टल, एनएलईपी एमओएच, एनव्हीबीडीसीपी, प्रशासन, आदी गटातही कामगिरी फारशी चांगली नसल्यामुळे महापालिकेला पहिल्या दहा शहरांमध्ये देखील स्थान मिळू शकलेले नाही. महापालिकेच्या आरोग्य- वैद्यकीय विभागाने या आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आरोग्य सेवा संचालकांकडून अल्टीमेटम

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीत परभणी, जळगाव, पनवेल, लातुर आणि बृहन्मुंबई महापालिकांची कामगिरी असमाधानकारक आहे. त्यामुळे आरोग्य सेवा संचालकांनी या महापालिकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

राज्यातील पहिल्या पाच महापालिका

महापालिका- (कंसात गुण- टक्के)

  1. सांगली (५२,७१)

  2. पिंपरी चिंचवड (४९.२२)

  3. नवी मुंबई (४६.५५)

  4. कोल्हापूर (४२.७७)

  5. अहिल्यानगर (४०.९४)

राज्यातील शेवटच्या पाच महापालिका

महापालिका- (कंसात गुण- टक्के)

  1. परभणी (३१.८०)

  2. जळगाव (३०.३१)

  3. पनवेल (३०.१९)

  4. लातूर (३०.१९)

  5. बृहन्मुंबई (२४.९३)

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून केली जात आहे. चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्याच्या माध्यमातून नाशिकची क्रमवारी उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT