

नाशिक : शासनाच्या आरोग्यसेवा उपसंचालक कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नाशिक महापालिकेने स्वत:च्या निधीतून दहा हजार ॲण्टिजेन कीट खरेदीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची रुग्णालये तसेच शहरी आरोग्यसेवा केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या, कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲण्टिजेन चाचणी केली जाणार आहे.
राज्यात मुंबई, पुण्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळल्याने नाशिक महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. नाशिकमधून मुंबई-पुण्याच्या दिशेने दररोज हजारो लोक जा-ये करत असतात. अशात कोरोनाचा संसर्ग मुंबई-पुण्याहून नाशिकमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट वेगाने पसरणारा असल्याने संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा महापालिकेतर्फे केला जात असला तरी सतर्कतेची बाब म्हणून जुन्या नाशकातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय तसेच नाशिक रोड विभागातील स्व. बाळासाहेब ठाकरे रुग्णालयांत स्वतंत्र कोरोना कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांसाठी या कक्षात २० बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचे निदान होण्यासाठी कोरोनासदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी अॅ ण्टिजेन किटची आवश्यकता आहे. वैद्यकीय विभागाने तातडीची बाब म्हणून जिल्हा रुग्णालय तसेच आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे पाच हजार ॲण्टिजेन किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र, तूर्त या यंत्रणांकडेही किट उपलब्ध नसल्याने अखेर महापालिकेने दहा हजार किट खरेदीसाठी प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
ॲण्टिजेन चाचणीत रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्या रुग्णाला तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवून उपचार सुरू केले जातील. त्या रुग्णाची आरटीपीसीआर चाचणीदेखील केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीतही रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णाचे कुटुंबीय तसेच संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या केल्या जातील, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.
मुंबई, पुण्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक महापालिकेने कोरोना चाचण्यांसाठी दहा हजार ॲण्टिजेन किट खरेदीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲअण्टिजेन चाचणी केली जाईल. पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णाला तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल केला जाईल.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका