नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागरी क्षेत्रात महापालिकांच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा-सुविधांचा मासिक मूल्यमापन अहवाल आरोग्य सेवा आयुक्तालयातर्फे जाहीर करण्यात आला. जुलैत १९व्या स्थानावर असलेल्या नाशिक महानगरपालिकेने ऑगस्टमध्ये ११ व्या स्थानावर झेप घेतली आहे. सांगली महापालिकेने राज्यात पहिला क्रमांक पटकावला, तर पिंपरी-चिंचवडने दुसरे स्थान कायम ठेवले आहे. कोल्हापूर महापालिका तिसऱ्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत माता व बाल आरोग्य कार्यक्रम, कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, एनपीसीडीसीएस, डेंग्यूसह साथरोग नियंत्रण, एनयूएचएम आदी आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाते. या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचतात किंवा नाही, यातील कोणत्या सेवा मनपाच्या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक देण्यात आल्या, कोणत्या सेवा देण्यात महापालिका अपयशी ठरल्या, याचे आरोग्य सेवा विभागामार्फत दरमहा मूल्यमापन केले जाते. त्यात रुग्णालय, आरोग्यवर्धिनी, रुग्ण कल्याण समितीच्या कार्याचेही मूल्यमापन होते. याद्वारे राज्यातील २७ महापालिकांचे रँकींग करून जबाबदारी निश्चित केली जाते.
जुलै महिन्यात नाशिक महापालिका १९व्या स्थानावर होती. वैद्यकीय विभागाने आरोग्य सेवेत सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतल्यानंतर महापालिकेच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. नाशिक ११व्या स्थानावर आले आहे. क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात महापालिकेला कमी गुण मिळाले आहेत. यातही सुधारणा झाली असती, तर नाशिक महापालिकेचा पहिल्या पाच शहरांमध्ये समावेश होऊ शकला असता.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवांचे मूल्यमापन करताना ४०० गुण निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार परीक्षण करण्यात येते. आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीत नाशिक महापालिकेला ४०० पैकी १३७.५० गुण मिळाले आहेत. जुलैत महापालिकेला २६.३० टक्के गुण मिळाले होते.
आरसीएच पोर्टल, रेबिज कंट्रोल प्रोग्राम, एनएलईपी, एनसीडी, एनटीसीपी, एनयुएचएम यात महापालिकेला शून्य गुण आहेत. एड्स नियंत्रण कार्यक्रम, आदी आरोग्य सेवांमध्येही कामगिरी फारशी चांगली नसल्यामुळे महापालिकेला पहिल्या पाच शहरांच्या यादीत स्थान मिळू शकलेले नाही.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीत परभणी, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जळगाव व बृहन्मुंबई महापालिकांची कामगिरी सातत्याने असमाधानकारक राहिली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा संचालकांनी या महापालिकांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
गुणानुक्रम - महापालिका- (कंसात मिळालेले गुण - टक्केवारी)
सांगली (४५.०३)
पिंपरी - चिंचवड (४२,७१)
कोल्हापूर (४१.२४)
नवी मुंबई (४०.८५)
पुणे (३८.४९)
परभणी (२६.३७)
अकोला (२५.९६)
छत्रपती संभाजीनगर (२५.४९)
जळगाव (२३.९१)
बृहन्मुंबई (२०.०९)
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून काटेकोर केली जात आहे. चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्याच्या माध्यमातून नाशिकची क्रमवारी उंचावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. तानाजी चव्हाण, मुख्य वैद्यकीय आरोग्याधिकारी, महापालिका, नाशिक.