नाशिक :
नाशिकरोड पोलिसांनी एका अनोख्या कारवाईत वृद्धेच्या घरातील तब्बल १५ लाखांचे दागिने परत मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती, तसेच वृद्धेला दागिने चोरी झाल्याची माहितीही नव्हती. केवळ खबऱ्यांच्या नेटवर्कच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून संशयिताला अटक करत मोठा यश मिळवले.
गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, एका तरुणाचे राहणीमान अचानक उंचावले आहे. तो कार घेऊन मित्रांसोबत मुंबईत मौजमजा करण्यासाठी जात असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून रेल्वे स्टेशन परिसरातून संशयिताला ताब्यात घेतले. अटक केलेल्या तरुणाचे नाव शुभम मोरे असे आहे.
पोलिस चौकशीत शुभम मोरेने कबुली दिली की, त्याने पळसे गावातील ओळखीच्या वृद्ध महिला विमल कुन्हे यांच्या घरातून दागिने चोरले होते.
पुढील चौकशीत त्याने हे दागिने नाशिकरोड परिसरातील दोन सराफ व्यावसायिकांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी जेव्हा या सराफांचीही कसून चौकशी केली, तेव्हा त्यांनीही १५ लाख रुपये देऊन हे दागिने खरेदी केल्याची कबुली दिली.
या कारवाईनंतर नाशिकरोड पोलिसांनी चोरीस गेलेले दागिने जप्त करून वृद्धेच्या घरी परत मिळवून दिले. कोणतीही औपचारिक तक्रार नसतानाही पोलिसांनी तत्परता दाखवून केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.