Nashik ZP CEO Omkar Pawar  
नाशिक

Nashik ZP CEO Omkar Pawar | तिसरीच्या विद्यार्थ्यांना वाचन-लेखनात अडचणी; नाशिक जि. प. सीईओ ओमकार पवार आक्रमक!

Nashik ZP CEO Omkar Pawar | दिंडोरी तालुक्यातील आरोग्य केंद्र व शाळांना दिल्या भेटी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचा अनुभव राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अनेकदा कथन केलेला असताना मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनाही याचा अनुभव आला. दिंडोरी तालुक्यातील उमराळे आणि रासेगाव जिल्हा परिषद शाळेला पवार यांनी भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना वाचता आले नसल्याचे दिसून आले. यावर पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र यासह शाळांना भेटी देत आढावा घेतला. उमराळे येथील शाळा भेटीदरम्यान पवार यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांची उपस्थिती, पायाभूत सुविधा आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली.

तसेच निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, वाचन-लेखन तसेच मूलभूत गणितीय कौशल्यांची स्थिती काय आहे, याबाबत शिक्षकांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अभ्यासाबाबत तसेच वाचन, लेखन आणि गणित विषयातील प्रगतीबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे उत्तरे देत पवार यांच्याशी संवाद साधला.

रासेगाव शाळेत त्यांनी शाळेतील विविध सुविधांची पाहणी करून निपुण अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अभ्यासाची पद्धत, आवडते विषय, वाचनाची सवय आणि भविष्यातील ध्येय याबाबत त्यांनी चर्चा केली.

नियमित वाचन, लेखनाचा सराव आणि मूलभूत गणितीय कौशल्ये विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांच्या पायाभूत शैक्षणिक क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी निपुण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी शिक्षकांना दिल्या.

आरोग्य केंद्राला भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र उमराळे येथे प्रत्यक्ष भेट देत आरोग्य सेवांची पाहणी केली. बाह्यरुग्ण विभाग, औषधसाठा, उपलब्ध आरोग्य सेवा, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत यावेळी त्यांनी माहिती घेतली.

ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT