Nashik Zilla Parishad Anganwadi Pudhari File Photo
नाशिक

Nashik Zilla Parishad Anganwadi |अंगणवाडीतील चिमुरड्यांना मिळणार नवा 'युनिफॉर्म'

Nashik Zilla Parishad Anganwadi | सरकारी अंगणवाड्यांना 'कॉन्व्हेंट'चा लूक! दीड लाख चिमुरड्यांना मिळणार हक्काचा गणवेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालके लवकरच एका नव्या रूपात दिसणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमात अंगणवाडी बालकांसाठी गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे जिल्ह्यातील ५ हजार २१२ अंगणवाड्यांतील ३ ते ६ वयोगटातील दीड लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.

पाया अंगणवाडी हा मुलांच्या शिक्षणाचा असतो. अंगणवाडीतील बालकांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्यात शिस्त व समानतेची भावना जोपासली जावी, यासाठी जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाकडून प्रयत्न सुरू असतो. अंगणवाडीतील बालकांचे कुपोषण होऊ नये यासाठी ओमकार पवार यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

त्यासाठी दत्तक बालक घेऊन पोषणदूत योजना राबवत आहे. याचे परिणामही सकारात्मक दिसू लागले आहेत. पवार यांनी अंगणवाडीतील लहान वयात मुलांना शाळेची सवय व्हावी यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांतील बालकांना हक्काचा गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी जिल्हा परिषदेने सादर केलेल्या अंदाजपत्रकात महिला बालकल्याण विभागांतर्गत योजनांमध्ये ४० लाखांची विशेष निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत अंगणवाड्यांमधील ३ ते ६ वयोगटातील बालकांना याचा लाभ मिळेल.

पालकांकडून स्वागत

ओमकार पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील पालकांनी स्वागत केले आहे. खासगी कॉन्व्हेंटच्या धर्तीवर आता सरकारी अंगणवाड्यांतील मुलांना गणवेश मिळणार असल्याने ग्रामीण भागातील पालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे मुलांची उपस्थिती वाढून कुपोषण निर्मूलन आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अंगणवाडीतील बालकांना शालेय वातावरणाची अनुभूती मिळावी, यासाठी आम्ही गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील बालकांना कॉन्व्हेंटच्या धर्तीवर अंगणवाडीत शिक्षण घेण्याची अनुभूती मिळेल. जेणेकरून अंगणवाडीतील बालकांची संख्या वाढेल.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT