Nashik News Pudhari
नाशिक

Nashik News: पोलीस ठाण्यातच तरुणाचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न

दोन्ही प्रकरणांनी खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नाशिक: उपनगर पोलीस ठाण्यात एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.२२) रात्री घडली असून यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

आदेश निवृत्ती बुवा (रा. धोबीवाडा, देवळाली गाव) याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या समोरच विष प्राशन केले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालय येथे दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊबंदकीतील वादातून उपनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रार मागे घेण्यावरून तणाव निर्माण झाला होता. आदेश बुवा आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध एकतर्फी व खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत तो संतप्त झाला होता.

पोलीस आपले म्हणणे ऐकत नसल्याच्या निषेधार्थ त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर त्याचे वडील निवृत्ती बुवा व नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल होत आक्रोश व्यक्त केला.

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित दुसरी गंभीर घटना नाशिकरोड येथील धोबी मळा परिसरात घडली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आदेश निवृत्ती बुवा, दादु नंदु बुवा, रिना दादु बुवा, मनिषा निवृत्ती बुवा, अविनाश संपत बुवा, किशोर संपत बुवा, मयूर निवृत्ती बुवा, निवृत्ती जगन्नाथ बुवा व सचिन भिमनाथ बुवा (सर्व रा. धोबी मळा, देवळाली गाव) यांनी २१ एप्रिल रोजी सकाळी तिच्या घरासमोर येऊन तक्रार मागे घेण्याचा दबाव टाकला.

त्यानंतर घरात घुसून लाथाबुक्यांनी मारहाण केली. दादु बुवा व रिना बुवा यांनी लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर आदेश बुवा याने तिचा ब्लाऊज फाडून विनयभंग केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून तपास पोउपनि प्रभाकर सोनवणे करत आहेत. मात्र बुवा कुटुंबीयांनी ही फिर्याद खोटी असल्याचा आरोप करत पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. दोन्ही घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT