Nashik Woman Harassment Pudhari
नाशिक

Nashik Crime: नाशिक हादरलं! महिलेची छेड काढल्यानंतर कुटुंबाचा 20 किमी पाठलाग; लोखंडी रॉडने कारची तोडफोड, 9 आरोपींना अटक

Nashik Woman Harassment: इगतपुरीतील भावली धरण परिसरात सहलीसाठी गेलेल्या महिलेची छेड काढल्यानंतर आरोपींनी तिच्या कुटुंबाचा सुमारे 20 किलोमीटर पाठलाग करत कारची तोडफोड केली.

पुढारी वृत्तसेवा

Nashik Woman Harassment: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबातील महिलेची छेड काढल्यानंतर आरोपींनी तब्बल 20 किलोमीटर कारचा पाठलाग करत लोखंडी रॉडने वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील आठ जणांचे एक कुटुंब रविवारी इगतपुरी येथील भावली धरण आणि धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. कुटुंबासोबत चार लहान मुलेही होती. दिवसभर सहलीचा आनंद घेतल्यानंतर कुटुंब परतण्याच्या तयारीत असताना दोन तरुणांनी कुटुंबातील एका महिलेची छेड काढली.

पीडित महिलेने या प्रकाराला तात्काळ विरोध केला. तिच्या पतीनेही आरोपींना जाब विचारला. मात्र, त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. सुरुवातीला दोघे असलेले आरोपी काही वेळातच त्यांच्या इतर साथीदारांना बोलावून घेऊन आले. त्यानंतर सुमारे 10 ते 12 जणांच्या टोळक्याने कुटुंबाला घेरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वाद वाढत असल्याचे लक्षात येताच कुटुंबाने तेथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांची कार अडवून वाहनाच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोखंडी रॉडच्या साहाय्याने कारवर हल्ला करत त्यांनी कुटुंबाच्या वाहनाचा सुमारे 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केल्याचा आरोप आहे.

पीडित महिलेने सांगितले की, आरोपी चारचाकी आणि दुचाकींवरून सतत त्यांच्या कारचा पाठलाग करत होते. वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणी कार अडवून पुन्हा हल्ला केला जात होता. या भीषण प्रसंगामुळे कुटुंबातील सर्व सदस्य, विशेषतः चार लहान मुले, प्रचंड घाबरली होती.

या घटनेबाबत बोलताना पीडित महिलेने सांगितले की, "आम्ही गाडी थांबवली असती तर ते आम्हाला मारून टाकतील, अशी भीती वाटत होती. त्यांनी आमच्या कारवर लोखंडी रॉडने हल्ला केला. हा प्रसंग शब्दांत सांगता येणार नाही."

महिलेने पुढे सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी महिलेशी गैरवर्तन करण्याचे धाडस आरोपींनी कसे केले आणि त्यांना जाब विचारल्यानंतर इतका हिंसक हल्ला करण्याची हिंमत कशी झाली, याचाच धक्का बसला आहे.

तिने स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मी घाबरणार नाही. महिलांची छेडछाड होत असेल तर त्याविरोधात भविष्यातही आवाज उठवेन." तसेच, या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडण्यापूर्वी इतरांना धडा मिळेल, अशी मागणीही तिने केली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात नऊ आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एका आरोपीवर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. भावली धरण आणि धबधबा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने अशा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT