नाशिक

Nashik Waste to Energy project : महापालिका स्वत:च चालविणार ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प, ठेकेदारासमवेतचा करार रद्द

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रा. लि. बंगळुरू या मक्तेदाराने पूर्ण क्षमतेने प्रकल्प न चालविल्यामुळे डब्यात गेलेला 'वेस्ट टू एनर्जी' अर्थात ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला आहे. या प्रकल्पाच्या यंत्रणेतील महत्त्वाचा भाग असलेला परंतु नादुरुस्त झालेला गॅस व हवेचा बलून नव्याने बसविण्यात येणार असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. (Nashik Waste to Energy project)

महापालिकेच्या विल्होळी येथील खतप्रकल्पात जीआयझेड अंतर्गत २०१८ मध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प महापालिकेने सुरू केला. त्यासाठी बंगळुरू येथील विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रा. लि. या ठेकेदाराची निवड केली होती. महापालिका आणि ठेकेदारामध्ये झालेल्या करारानुसार ठेकेदाराने प्रकल्पासाठी लागणारे फूड वेस्ट संकलन करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे, प्लांट चालविणे आणि मनपाला दरमहा ३३०० युनिट इतकी वीज पुरवण्याची जबाबदारी ठेकेदार कंपनीकडे होती. या बदल्यात महापालिका ठेकेदार कंपनीला दरमहा पाच लाख रुपयांचा खर्च देणार होती. परंतु, प्रकल्प सुरू झाल्यापासून ते आजतागायत कंपनीने महापालिकेला वीज पुरवली नाही की, फूड वेस्टचेही हव्या त्या प्रमाणात संकलन केले नाही. वीज उपलब्ध करून न दिल्यामुळे मनपाने ठेकेदार कंपनीला वारंवार पत्र दिले तसेच नोटीसही बजावली. कंपनीकडून कराराचा भंग होत असल्याने दरमहा कंपनीला द्यावे लागणारे पाच लाख रूपये महापालिकेने देणे बंद केले. त्यामुळे याबाबत कंपनी आणि ठेकेदार यांच्यात कोणत्याही स्वरूपाचा तोडगा निघत नसल्याने आता हा वाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या लवादाकडे सोपविण्यात आला होता. लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यामुळे महापालिकेने ठेकेदारासमवेतचा करार दि. १९ जुलै २०२१ रोजी रद्द करत, आहे त्या स्थितीत ताब्यात घेतला. या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तसेच प्रकल्प चालविण्यासाठी महापालिकेने कर्मचारी नियुक्त केले आहेत. या प्रकल्पातील गॅस व हवेचा बलून फाटला असल्यामुळे गॅसनिर्मितीवर परिणाम झाला होता. परिणामी वीजनिर्मितीही रोडावली होती. त्यामुळे गॅस व हवेचा बलून नव्याने बसवण्यासाठी ४९.६५ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने गुरुवारी (दि. २९) मंजुरी दिली. (Nashik Waste to Energy project)

ठेकेदाराने प्रकल्प पूर्ण क्षमतेने न चालविल्यामुळे महापालिकेने हा प्रकल्प ताब्यात घेतला आहे. या प्रकल्पातील गॅस व हवेचा बलून नादुरुस्त झाल्याने वीजनिर्मिती रोडावली होती. त्यामुळे बलून नव्याने बसवला जाणार असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जाणार आहे. – बाजीराव माळी, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी), मनपा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT