Nashik Kalwan road car accident
वणी: कळवण–नाशिक मार्गावर वणी येथे हॉटेल गारवेलसमोर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. ही घटना आज (दि. १७) सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत एकूण आठ जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांना हात-पायांचे फ्रॅक्चर झाले आहे. एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार (क्र. MH 15 KG 7504) नाशिकहून सप्तशृंगी गडकडे जात होती, तर दुसरी कार (क्र. MH 20 GV 4214) नांदुरीकडून नाशिकच्या दिशेने येत होती. वणी येथील हॉटेल गारवेलसमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता मोठी असल्याने दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात आदित्य विजय पवार (रा. सातपूर, नाशिक), संदीप राजेंद्र चव्हाण (रा. उत्तर प्रदेश), साई पासवान (रा. सातपूर, नाशिक), विवेक चव्हाण (रा. नाशिक), शेखर श्याम पवार (रा. नाशिक), सौरभ शिवाजी धामणे (रा. वैजापूर, संभाजीनगर), जितेंद्र बबन इंगळे (रा. वाटूर फाटा, जालना) आणि यशवंत आप्पासाहेब गावडे (रा. वैजापूर, संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण व अन्य परिस्थितीचा तपास सुरू आहे.