नाशिक

Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर (जि, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शनिवार (दि.23)पासून त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली आहे. यंदा नाताळ सहलींच्या गर्दीत वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (दि.24) कुंभमेळा पर्वणीप्रमाणे गर्दी वाढल्याने शहरातील काही रस्त्यांवर चालण्यास जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढचा संपूर्ण आठवडा गर्दीचा माहौल कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

भाविक पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाल्याने निवास, प्रवास यासह अन्य सुविधा महागल्या आहेत. शनिवारच्या रात्रीला 300 रुपयांत मिळणारी खोली 3 हजार रुपये देऊनही मिळत नसल्याचे दिसून आले. यामुळे भाविकांनी सोबतच्या वाहनातच रात्र काढावी लागली. शहरातील वाहनतळ भाविक, पर्यटकांच्या वाहनांनी फुल्ल झाले आहेत. रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून त्यांचे पैसे घेतले जात आहेत. वाहनतळावर पाच कोटी रुपयांचे दोनमजली वाहनतळ बांधूनही पार्किंगची समस्या सुटलेली नाही. शहरातील काही शासकीय भूखंड वाहनतळाच्या नावाने बांधकाम करत अडवल्याने त्यांचा वापर होत नाही. दररोज रात्री दर्शनबारीतील भाविकांना दर्शन घेऊन बाहेर पडण्यास रात्रीचे बारा वाजत आहेत. दर्शनबारीत आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता. काही भाविकांनी गर्भगृहासमोर क्षणभरही उभे राहू न देता धक्का दिला जात असल्याचा आरोप केला. देवस्थान ट्रस्ट प्रशासनाने रविवारी फक्त पूर्व दरवाजा दर्शनबारीने प्रवेश करता येईल, असे नियोजन केले होते. 200 रुपये दर्शनबारी व मंदिराचा उत्तर दरवाजा पूर्णत: बंद केला होता.

दर्शनाचा भ्रष्टाचार बंद

देवस्थान ट्रस्ट कार्यालय इमारतीच्या उत्तर आणि दक्षिण दरवाजाने तथाकथित व्हीआयपी म्हणून प्रवेश दिला जातो. यावर नियंत्रणासाठी राजशिष्टाचार पत्र दिले जाते. यामार्गे भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आल्याने रविवारी राजशिष्टाचार पत्राचा वापर थांबवण्यात आला होता. बंद दरवाजासमोर लावलेल्या बॅरिकेडिंगवर बेल फुले वाहत डोके ठेवून भाविक दर्शनाचे समाधान मानत होते, तर कळसाकडे पाहत हात जाेडत माघारी फिरत होते.

लोखंडी दरवाजे उघडण्याची अपेक्षा

उपजिल्हा रुग्णालयाजवळच्या लोखंडी प्रवेशद्वाराने वारंवार रहदारीची कोंडी होत होती. शहरात प्रचंड गर्दी असताना व वाहने बाहेर थांबवली जात असताना शहरातील लोखंडी दरवाजे उघडल्यास रहदारीला अडथळा होणार नाही. भाविकांना पायी चालणे सोयीचे होईल, याकडे लोखंडी दरवाजाची किल्ली असणाऱ्यांनी लक्ष देण्याची अपेक्षा भाविकांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT