Crime News : हप्त्याची मागणी; स्वयंघोषित दादा गजाआड | पुढारी

Crime News : हप्त्याची मागणी; स्वयंघोषित दादा गजाआड

चाकण : पुढारी वृत्तसेवा :  माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. तुझी बेकरी चालवायची असेल तर 1 हजार 500 रुपये हप्ता द्यावा लागेल; अन्यथा तुला कोयत्याने मारतो, अशी स्वयंघोषित दादाने एका बेकरीचालकास धमकी दिली. बेकरीचालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना शनिवारी (दि. 23) चाकण येथील नेहरू चौकात घडली. विवेक ऊर्फ युड्या रामदास कुर्‍हाडे (रा. चाकण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मोमीन अहमद अन्सारी (वय 30, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेकर्स ब्राऊन बेकरीत असताना आरोपी तेथे आला. तुझी बेकरी चालवायची असेल तर 1 हजार 500 रुपये हप्ता द्यावा लागेल. मी या भागाचा दादा आहे. माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे, असे म्हणत आरोपीने बेकरीसमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादीला शिवीगाळ केली. मला हप्ता दिला नाही, तर कोयत्याने मारहाण करतो, अशी धमकी आरोपीने दिली.

Back to top button