नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हवामान विभागाने त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह नाशिक ग्रामीणसह पश्चिम घाटात मंगळवारी (दि. ७) ढगफुटीचा इशारा दिला आहे. विशेषतः त्र्यंबकेश्वर तालुक्यात ढगफुटीचा धोका अधिक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी मंदिरांत दर्शन बुधवारी (दि.८) सकाळ-पर्यंत बंद राहणार आहे. मंगळवारी सकाळी १०पर्यंत ढगफुटीची तीव्र शक्यता तर दुपारी 3 पर्यंत अतितीव्रतेचा काळ असणार आहे. महसूल विभागासह पोलिस, आरोग्य, सा. बां., ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य विभागांना आवश्यक तयारी ठेवण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सा. बां. चे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपजिल्हाधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, संभाव्य ढगफुटी भागात पूर, भूस्खलन, रस्ते बंद होणे, नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याच्या शक्यतेने बचाव पथके सज्ज आहेत.
नागरिकांनी या काळात अनावश्यक प्रवास टाळावा, नदी नाले, धबधबे आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे. डोंगराळ आणि भूस्खलनप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतकरी, पर्यटक आणि पश्चिम घाट परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी प्रवासाचे नियोजन टाळावे, असे आवाहन केले आहे.
'नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनी सतर्क राहावे' नाशिक जिल्हा आणि विशेषतः त्र्यंबकेश्वर भागात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळे या भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांसाठी २४ तास अत्यंत महत्त्वाचे असून, सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, हवामान खात्याने त्र्यंबकेश्वरसह परिसरात जवळपास ३०० मिमी इतका प्रचंड पाऊस होऊ शकतो, असे सांगितल्याने परिस्थितीवर करडी नजर ठेवून आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रांतील शाळांना सुट्टी देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेल्पलाइन क्रमांक जारी आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून ०२५३-२३१७१५१ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी संकटाच्या स्थितीत क्रमांकासह पोलिसांचा आपत्ती नियंत्रण कक्ष १०७७, आपात्कालीन क्रमांक ११२ व रुग्णवाहिकेसाठी १०८, अग्रिशमन दल १०१ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे