Road Potholes Pudhari
नाशिक

Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबक प्रवासाला लागताहेत तीन तास! जीवघेण्या खड्ड्यांमुळे 28 किमी रस्त्याची झाली चाळण

Nashik Trimbakeshwar Road | पावसाला सुरुवात झाली तसे वर्षा सहलींना तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. उत्तरभारतीय श्रावण महिना सुरू झाला असून, भाविकांची संख्या वाढते आहे.

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

पावसाला सुरुवात झाली तसे वर्षा सहलींना तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. उत्तरभारतीय श्रावण महिना सुरू झाला असून, भाविकांची संख्या वाढते आहे. मात्र, नाशिक-त्र्यंबक रस्त्याच्या दुरवस्थेने पर्यटकांसह भाविक हैराण झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांची गती इतकी मंदावली आहे की, २८ किमी अंतरासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे.

गुजरात, सिल्वासा, दिव, दमण यांना जोडणारा नाशिक-त्र्यंबक हा महत्त्वाचा रस्ता आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ७०० बसेसची दररोज ये-जा या रस्त्याने होते. त्यात अलीकडच्या काही वर्षांत सिटीलिंक बसची भर पडली आहे. यात्रा करणाऱ्या खासगी बस मोठ्या संख्येने असतात.

सिल्वासा, दमण गुजरात औद्योगिक वसाहतीला जोडणारा रस्ता असल्याने अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्याने होते. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी एका बाजूचा रस्ता वाहतुकीला बंद ठेवत दुसऱ्या बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र, या खुल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तर नव्याने तयार केलेला एका बाजूचा रस्ता उंचवट्याचा झाला आहे.

नवा रस्ता काही ठिकाणी वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्या रस्त्याने वाहन चालवताना वाहनचालकांची कसरत होत आहे. नाशिक-त्र्यंबक २८ किमी अंतराच्या प्रवासाला ३ तासांपेक्षा जास्त वेळ लागत आहे. नाशिक येथे कामकाजासाठी जाणाऱ्या नागरिकांना दिवसातील ६ तास प्रवासासाठी लागत असल्याने नको तो प्रवास, अशी भावना निर्माण झाली आहे.

रस्त्याची अशी दुरवस्था झालेली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे निमूटपणे पाहत आहे. या रस्त्याने येणारे राज्य व केंद्रातले मंत्री, विविध प्रांतांतील आमदार आणि खासदार, उच्च अधिकारी, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या रस्त्याचा वापर करत वाहनाने त्र्यंबकेश्वर येथे येतात.

दोन दिवसांपूर्वी कुंभमेळा आयुक्त, विभागीय आयुक्त यांचे पथक येथे पाहणीसाठी आले होते. यापैकी कोणाच्याही लक्षात या रस्त्याचा धोकादायक प्रवास येत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक दररोज अपरिहार्यपणे या रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

आतापर्यंत सातत्याने अपघात झाले आहेत. यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले, तर काहींना आयुष्यात जायबंदी केले आहे. कुंभमेळा पर्वकाळ येण्यास आणखी एक वर्ष बाकी आहे. तोपर्यंत हा रस्ता सुस्थितीत करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT