

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल निनोचे सावट असताना नाशिक जिल्ह्यावर यंदाच्या पावसाळ्यात वरुणाची मोठी कृपादृष्टी पाहायला मिळत असून, जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे ९८.३ टक्के पाऊस झाला. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ८७.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणेही तुडुंब भरली असून, नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीला आतापर्यंत तब्बल ४१ टीएमसी पाणी सोडण्यात आले.
भारतीय हवामान विभागाने सुरुवातीला अल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज वर्तवला असतानाही, नाशिकमध्ये मात्र पावसाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. चालू हंगामात सरासरीच्या तब्बल ८७.३ टक्के अधिक पाऊस झाला. त्यामुळे नाशिक जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस असणारा अव्वल जिल्हा ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ प्रमुख धरणांत आजमितीस ८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
गंगापूर धरण समूह आणि गोदावरी खोऱ्यातील नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर या मुख्य धरणात सध्या ८४.२५ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर काश्यपी धरणात ९३.२० टक्के व गौतमी-गोदावरी धरणात ९०.८५ टक्के साठा उपलब्ध आहे. आळंदी धरण पूर्ण भरले असून, आळंदी धरणातून २४३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
या संपूर्ण धरण समूहात मिळून एकूण ८८.३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गंगापूर धरणातून ५७४ क्युसेक वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. पालखेड व दारणा समूह शंभर टक्के भरले असून यात वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी ही धरणे पूर्ण क्षमतेने आहेत.
याशिवाय दारणा धरणात सध्या ८५.९३ टक्के पाणीसाठा झाला असून, दारणा धरण समूहातून ८०२० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नांदूरमध्यमेश्वरमधून २२,७७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. गिरणा समूहात एकूण ९४.६० टक्के इतका पाणीसाठा नोंदवला गेला.
राज्यभरात ३१ जुलैपर्यंत झालेल्या पावसात नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ २ टक्के तूट नोंदवली गेली आहे, तुलनेत रत्नागिरी ७, सिंधुदुर्ग ३५, कोल्हापूर ३, अहिल्यानगर ७, सोलापूर २८, नंदुरबार ४७, सांगली ३, बीड २३, धाराशिव ७ व हिंगोलीमध्ये तब्बल ३० टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात येलो अलर्ट जारी केलेला असताना पेठ व सुरगाणा तालुक्यांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. दिंडोरी परिसरातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, जिल्ह्याच्या उर्वरित भागात पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.
नाशिक शहर परिसरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रविवारी (दि. २) दिवसभर ढगाळ वातावरण कायम असले तरी घाटमाथा परिसरातच पावसाचा जोर अधिक दिसून आला. सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक ३६.८ मिमी पावसाची नोंद झाली. पेठ आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी २७.५ मिमी, इगतपुरी येथे १४ मिमी पाऊस झाला. दिंडोरी तालुक्यात १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या इतर भागात मात्र किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला. निफाडला ७.३ मिमी, सिन्नरला ७.१, नाशिक शहर परिसरात ६.९, चांदवडला १.७, बागलाणला १, येवला येथे ०.५, कळवण व देवळा येथे प्रत्येकी ०.३, तर मालेगाव आणि नांदगाव येथे प्रत्येकी ०.१ मिमी पावसाची नोंद झाली.