नाशिक : नाशिकमध्ये आदिवासी बांधवांसाठी आदिवासी विद्यापीठ सुरू करण्यात येईल. या विद्यापीठात ८० टक्के आदिवासी, तर २० टक्के अन्य विद्यार्थ्यांना जागा असतील. विद्यापीठात अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान विषयांच्या सर्वोत्तम सुविधा असतील. तसेच नाशिक औद्योगिकदृष्ट्या विकसित होत असल्याने या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे सोमवारी (दि. ९) खासदार, आमदार तसेच सर्वपक्षीय बैठक पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, खासदार प्रा. भास्कर भगरे, आमदार हिरामण खोसकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, नितीन पवार, मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, किशोर दराडे आदी उपस्थित होते.
नाशिकचे भौगोलिक स्थान बघता येथे आदिवासींच्या सर्वांगीण कल्याणासाठी आदिवासी विकास विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. मांजरपाडा-२ योजनेला मान्यता, रखडलेला निओ मेट्रो प्रकल्प, तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडित उद्योग, गोदावरीचे प्रदूषण व कॉंक्रिटीकरण, आरोग्य सुविधांबद्दल आमदारांनी राज्यपालांकडे समस्या मांडल्या.
सन २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करताना रामकुंड परिसरात नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढावे. कुंभाच्या दृष्टीने राज्य व केंद्रपातळीवरून निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा आमदारांनी व्यक्त केली. पालकमंत्री भुसे यांनी नार-पारच्या धर्तीवर मांजरपाडा-२ प्रकल्पाला विशेष मान्यता देण्याची विनंती राज्यपालांना केली. फरांदे यांनी माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित उद्योगांची निकड असल्याचे सांगितले. खाेसकर यांनी आदिवासी भागातील उपजिल्हा रुग्णालये तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्याची मागणी केली. झिरवाळ यांनी न्यायालयाच्या अधिनस्त राहून पेसा क्षेत्रातील १७ संवर्गातील भरतीचा प्रश्न निकाली काढण्याबाबत विनंती केली. हिरे यांनी महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना असून, शक्ती विधेयकाची प्रभावीपणे अंमलबजावणी आवश्यक असल्याकडे लक्ष वेधले. यावेळी उपस्थित आमदारांनीही विविध मुद्दे राज्यपालांपुढे विशद केले.
झिरवाळ यांनी राज्यपाल यांना गांधी टोपी आणि क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची मूर्ती भेट दिली. यावेळी आदिवासींच्या नावे वनपट्टे करताना सातबाऱ्यावर त्यांची नावे लावावी तसेच राज्यातील २५ आदिवासी आमदारांची मुंबईत बैठक घ्यावी, अशी विनंती झिरवाळांनी केली. आडगाव शिवारातील आयटी पार्कला मंजुरी देताना तेथे संबंधित उद्योग आणण्याची मागणी ढिकले यांनी केली.
नाशिक शहरातील रस्ते व त्यावर पडलेल्या खड्ड्यांबद्दल आमदारांनी राज्यपालांकडे तक्रारी केल्या. तसेच चुकीच्या पद्धतीने झालेले भू-संपादन, सिटीलिंकचा संप, अशुद्ध व कमी प्रमाणात हाेणारा पाणीपुरवठा याबाबतही लोकप्रतिनिधींनी राज्यपालांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहरातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याबद्दल महापालिकेला निर्देश द्यावेत, अशी मागणी आ. ढिकले यांनी केली.