Nashik Governor Visit | राज्यपाल आज जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींशी संवाद साधणार
नाशिक : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सोमवारी (दि. ९) नाशिक दाैऱ्यावर येत आहेत. यावेळी राज्यपाल हे जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींशी संवाद साधणार असून विविध प्रतिनिधींची भेट घेतील. (Governor C. P. Radhakrishnan is coming to Nashik visit)
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच राधाकृष्णन हे नाशिकमध्ये येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे सकाळी ११ ला ओझर विमानतळ येथे आगमन हाेणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे ११.४० ते १२.१० यावेळेत जिल्ह्यातील खासदार व आमदारांशी ते संवाद साधतील. याप्रसंगी पालकमंत्री दादा भुसे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राज्यपाल हे जिल्ह्यातील विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतील. दुपारी १.३० ते ४.२० पर्यंत विविध राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी ते संवाद साधतील. दुपारी ४.४० ला ओझर विमानतळ येथून ते विमानाने पुढील कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण करतील. दौऱ्यात कोणतीही कमतरता भासू नये याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पोलिस विभागाकडूनही बंदोबस्तासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

