नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दत्त मंदिर सिग्नलवर वाहतुकीचे नियम मोडून भरधाव कार चालवणाऱ्या चालकाने कारवाईसाठी पुढे आलेल्या वाहतूक पोलिसाला चक्क बोनेटवर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत बोनेट घट्ट पकडून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक ४ चे पोलिस हवालदार सुधीर राजाराम काकड (४७) हे दत्त मंदिर सिग्नलवर वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होते.
त्यावेळी संशयित चालक वैभव ज्ञानेश्वर दांडे (२२, मूळ रा. कावनई, ता. इगतपुरी, सध्या रा. ग्रॅज्युएट वडापाव दुकान, रविवार कारंजा) हा स्विफ्ट डिझायर कार (एमएच १५ जेएच ६५७७) मधून प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जात होता.
दांडे याने सिग्नलचे उल्लंघन करून मोटवाणी रोडच्या दिशेने जाणाऱ्या एका महिला दुचाकीस्वाराला धडक दिली. हा प्रकार पाहून हवालदार काकड यांनी कार थांबवण्यासाठी चालकाला इशारा केला.
त्यांनी बोनेटवर हात ठेवून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोनेटवर पोलिस कर्मचारी असल्याचे माहीत असूनही चालकाने कारचा वेग वाढवला. काकड यांनी बोनेट घट्ट पकडून ठेवल्याने त्यांचा जीव वाचला. घटनेनंतर उपनगर पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.