शिक्षक निवडणुकीत मतदानासाठी रांगेत उभे असलेले मतदार File Photo
नाशिक

Nashik Teachers Constituency|शिक्षक निवडणुकीत ९३.४८ टक्के मतदान

विभागातील मतदारांमध्ये उत्साह; १ जुलै रोजी मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २८) झालेल्या मतदानावेळी विभागात ९३.४८ टक्के शिक्षकांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. नाशिकमध्ये पैसे वाटपाचा वादवगळता पाचही जिल्ह्यांत शांततेत मतदान पार पडले. निवडणुकीमध्ये २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले आहे. विभागात नंदुरबारमध्ये उच्चांकी मतदान झाले असून, नाशिकमध्ये निचांकी मतदानाची नोंद झाली. शिक्षकांनी कोणाच्या पारड्यात कौल टाकला हे १ जुलै रोजी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

  • -विभागातील ६४,८४६ मतदारांनी बजावला हक्क

  • -४३,७२२ पुरुष; २१,१२४ महिलांनी केले मतदान

  • -२०१८ च्या तुलनेत यंदा १.४८ टक्के मतदान वाढले

गेल्या पंधरवड्यात पैठणी, नथ, कापड व पैसे वाटपामुळे अवघ्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडले. विभागातील पाचही जिल्ह्यांतील ९० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत शिक्षकांमध्ये उत्साह असल्याने सकाळी सातपासून मतदान केंद्रांमध्ये रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी महिला मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मात्र, मतदान प्रक्रिया संथगतीने सुरू असल्यामुळे मतदानासाठी शिक्षकांना तासन्तास केंद्राबाहेर ताटकळत उभे राहावे लागले. परिणामी, अनेक ठिकाणी सायंकाळी सहानंतरही रांगा लागलेल्या होत्या.

नंदुरबारमध्ये सर्वाधिक ९६.१२ टक्के मतदान

नाशिक जिल्ह्यात २९ केंद्रांवर मतदान पार पडले. शहरातील बी. डी. भालेकर विद्यालयाच्या केंद्राबाहेर एका उमेदवाराच्या कार्यकर्त्याला पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी करत पैसे वाटप करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. उर्वरित जिल्ह्यासह विभागातील चारही जिल्ह्यांत मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, विभागात नंदुरबारमध्ये सर्वाधिक ९६.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. नाशिकला सर्वात कमी ९१.६३ टक्के मतदान झाले. मतदानानंतर जनतेचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे.

नाशिकमध्ये मतमोजणी

शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यांतील मतपेट्या बंदोबस्तात अंबड औद्योगिक वसाहतीमधील वेअर हाउसमध्ये रवाना करण्यात आल्या. तेथे उभारण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये मतपेट्या जतन केल्या जाणार आहेत. या ठिकाणी येत्या सोमवारी (दि.१) सकाळी आठपासून पाचही जिल्ह्यांतील मतपत्रिकांची एकत्रित मतमोजणी केली जाईल.

खा. भगरे मतदानास वंचित

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक असून, शिक्षक मतदार यादीत त्यांचेही नाव समाविष्ट आहे. पण भगरे हे सध्या दिल्ली येथे संसदेच्या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे मतदानापासून त्यांना वंचित राहावे लागले,

विभागातील मतदान

जिल्हा टक्के

नंदुरबार 96.12

धुळे 93.77

जळगाव 95.26

नाशिक 91.63

नगर 93.88

एकूण 93.48

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT