नाशिक : महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसह विविध विकासकामांसाठी सुरू केलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली आहे. नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी लवादाने त्रिसदस्यीय संयुक्त समिती नेमून दोन आठवड्यांत अहवाल मागविला आहे. तसेच महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण समितीला म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणावर आता १५ जानेवारीला पुढील सुनावणी होत आहे. या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.
तपोवनात साधुग्राम उभारणीसाठी प्रस्तावित एक हजार ८२५ वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन उभारलेले असताना, मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढीच्या नावाखाली एक हजार २७० झाडे तोडल्याची धक्कादायक कबुली महापालिकेने दिल्यामुळे पर्यावरणप्रेमी अधिक आक्रमक झाले आहेत. या वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे नामांकित वकील श्रीराम प्रल्हादराव पिंगळे यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाकडे धाव घेत वृक्षतोड रोखण्यासाठी शुक्रवारी (दि. १२) याचिका दाखल केली होती. तातडीची बाब म्हणून या याचिकेवर न्यायाधीश दिनेशकुमार सिंह व तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजितकुमार वाजपेयी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने साधुग्राम, रस्ते, गोदाघाट, त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण आणि इतर सार्वजनिक क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीची प्रक्रिया सुरू केल्याचे पिंगळे यांनी लवादाच्या निदर्शनास आणून देत, योग्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन न करता, व्यवहार्य पर्यायांचा शोध न घेता आणि महाराष्ट्र (शहरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन कायदा, १९७५ अंतर्गत वैधानिक आवश्यकतेचे स्पष्टपणे उल्लंघन करून महापालिकेतर्फे हजारो झाडे तोडली जात असल्याचा आरोप केला. वृक्षतोडीसाठी वृक्ष प्राधिकरण सार्वजनिक सूचना दिली नाही. वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्षगणना न करताच वृक्षतोडीच्या परवानग्या दिल्या. त्यामुळे नाशिकच्या पर्यावरणाचे अपरिवर्तनीय नुकसान होईल म्हणून महापालिकेमार्फत सुरू असलेली नियमबाह्य वृक्षतोड थांबविण्यात यावी, अशी मागणी ॲड. पिंगळे यांनी लवादासमोर मांडली.
पडताळणीसाठी त्रिसदस्यीय समिती
ॲड. पिंगळे यांनी याचिकेत केलेल्या मागणीनुसार लवादाने महापालिकेच्या वृक्षतोडीला स्थगिती दिली असून, महापालिकेला म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, विभागीय वन अधिकारी आणि नाशिक महापालिका आयुक्तांची त्रिसदस्यीय संयुक्त समिती नियुक्त करून दोन आठवड्यांत नेमक्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर आता १५ जानेवारीला पुढील सुनावणी होत असून, तोपर्यंत एकही झाड न तोडण्याचे निर्देश लवादाने दिले आहेत.
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अण्णा हजारेंचा संताप
नाशिक : तपोवनातील वृक्षतोडीविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चांगलेच संतापले आहेत. कुंभमेळासाठी येणारे सांधू संत हे जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर राहतात का?, असा संतप्त सवाल हजारे यांनी करत वृक्षतोडीला विरोध दर्शविला आहे.
अहिल्यानगर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीबद्दल प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. हजारे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठी येणारे सांधू संत हे जंगलात राहणारे असतात. ते काय झाडावर राहतात का? असा संतप्त सवाल हजारे यांनी केला आहे. राळेगणमध्ये येथे कोणी झाडाची एक फांदी जरी तोडली तरी मला वेदना होतात. मी कुठेही कोणाला झाडे तोडू देत नाही. खरंतर स्वार्थी लोकं वाढत चालले समाज आणि देशाच्या हितासाठी बलिदान करण्याची तयारी कमी होत चालली असून आमच्यासारखे काही लोकं आहे आणि बलिदान करतील असे मला विश्वास वाटते असे अण्णा म्हणाले.
लोक सरकारला 'चले जाव' म्हणतील!
सरकारविरोधात आज जरी लोक बोलत नसले तरीव एक दिवस येईल. लोक संताप व्यक्त करत सरकाला उद्देशून 'चले जावं' म्हणतील, असे नमूद करत तो दिवस दूर नाही, असा इशारा देखील अण्णा हजारे यांनी दिला. जनता मालक आणि तुम्ही सेवक आहे. म्हणून मालकाला अधिकार असतांना मालकाचे अधिकार तुडवणे बरोबर नाही, अशी प्रतिक्रिया देत अण्णांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
महापालिकेच्या वृक्षतोडीवरून अंजली दमानिया संतापल्या
नाशिक : तपोवनातील साधुग्रामच्या जागेतील प्रस्तावित १८२५ वृक्षतोडीचा वाद कायम असताना महापालिकेने मलनिस्सारण केंद्रांच्या विस्तारीकरणासाठी १२७० झाडे तोडल्याची कबुली दिल्याने सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया संतापल्या आहेत. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना मस्ती आली आहे. त्यांना राजकारणातून फेकून द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली आहे.
नाशिकमधील वृक्षतोड प्रकरणाने राज्याचे राजकारण तापू लागले आहे. वृक्षतोडीवरून दमानिया यांनी कुंभमेळामंत्री महाजन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दमानिया म्हणाल्या की, वृक्षतोडीला एवढा विरोध होत आहे, तरी गिरीश महाजनांना एवढी मस्ती आहे की त्यांनी नाशिकमध्ये झाडे तोडली. लोकांनी आंदोलन करा, आम्हाला जे करायचे ते आम्ही करणार असे ते म्हणत आहेत. महाजन यांना लक्षात ठेवा. राजकारणातून त्यांना फेकून द्या, असे संतप्त आवाहन दमानिया यांनी जनतेला केले आहे. दरम्यान, तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीबद्दल शहरात तीव्र विरोध सुरू असताना, सरकारने शहरात वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेअंतर्गत राजमुद्री येथून आणलेली झाडे आता टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली आहे. पहिला ट्रक नाशिकमध्ये दाखल झाला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच दक्षिण भारतातील राजमुद्री येथे भेट देत झाडांची निवड केली. सुमारे १५ फूट उंचीची १५ हजार देशी वड, पिंपळ, निंब, जांभूळ, आंबा यांचा समावेश आहे.