नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीकरिता किती झाडे तोडावी लागणार, याची कुठलीही आकडेवारी महापालिका प्रशासनाला देता न आल्याने वृक्षतोडीबाबतची महापालिका आयुक्तांनी बोलविलेली पर्यावरणप्रेमींसोबतची समन्वय बैठक सोमवारी (दि. ८) निष्फळ ठरली. साधुग्रामच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या प्रदर्शनी केंद्राला कडाडून विरोध दर्शवित एकही झाड तोडू देणार नाही, अशी कठोर भूमिका पर्यावरणप्रेमींकडून घेण्यात आली, तर साधुग्रामसाठी काही झाडे तोडावीच लागणार, असे ठामपणे सांगत वृक्षतोडीला विरोध असेल तर साधुग्राम उभारायचे कोठे, असा प्रतिसवाल आयुक्त मनीषा खत्री यांनी पर्यावरणप्रेमींना केल्याने तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीतून निश्चित स्वरूपाचा तोडगा निघू शकला नाही. प्रशासनाकडून समाधान होऊ न शकल्याने तपोवनातील वृक्षतोडीविरोधातील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारणीच्या नावाखाली १८२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केल्याने नाशिकमध्ये महापालिका विरुद्ध पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी नागरिक असा संघर्ष उभा राहिला आहे. शिवसेना (उबाठा), मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस या विरोधी पक्षांसह महायुतीच्या सत्तेतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गटा)ने देखील वृक्षतोडीला विरोध करत आंदोलनाला केवळ पाठिंबाच नव्हे, तर सक्रिय सहभाग घेतल्याने या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापू लागले आहे.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनी केंद्राला स्थगिती देण्याची घोषणा करत पर्यावरणप्रेमींसमवेत चर्चा करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर आयुक्त खत्री यांनी सोमवारी निवडक पर्यावरणप्रेमींना पाचारण करत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी पर्यावरणप्रेमींनी प्रस्तावित वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शविला. तपोवनात साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली मक्तेदारासाठी प्रदर्शनी केंद्र उभारण्याचा प्रशासनाने घाट घातल्याचा आरोप करत यासाठी एकही वृक्ष तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पर्यावरणप्रेमींकडून घेण्यात आली. प्रदर्शनी केंद्रासाठी एकही झाड तोडले जाणार नसल्याचा दावा करत साधुग्राम उभारणीसाठी काही झाडे तोडावीच लागतील, अशी भूमिका आयुक्त खत्री यांनी मांडली. मात्र, पर्यावरणप्रेमी आपल्या मुद्यावर ठाम राहिले.
साधुग्रामसाठी किती झाडे तोडली जाणार, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला. मात्र, त्यासंदर्भातील आकडेवारी प्रशासनाला सादर करता आली नाही. तपोवनात केलेल्या सर्वेक्षणात १८२५ झाडे आढळली. बांधकाम विभागाने यातील १५०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, प्रत्यक्ष साधुग्रामसाठी किती झाडे तोडावी लागणार, याचे सर्वेक्षण उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत झालेले नाही. ते झाल्यानंतर किती झाडे तोडावी लागणार याचा निश्चित आकडा दिला जाईल, असे आयुक्त खत्री यांनी सांगितले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे, मनोज साठे, अंबरीश मोरे, देवांग जानी, जसबीर सिंग, रोशन केदार, गौरव देशमुख, चंद्रकांत पाटील, ऋषिकेश नाझरे, दत्तू बोडके आदी उपस्थित होते.
संयुक्त सर्वेक्षणाची सूचना फेटाळली
तपोवनात साधुग्रामच्या उभारणीसाठी प्रत्यक्षात किती व कोणती झाडे तोडणार यासाठी पर्यावरणप्रेमी आणि महापालिका अधिकाऱ्यांमार्फत संयुक्त सर्वेक्षण करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आली. मात्र, कायद्यात तशी तरतूद नसल्याचे सांगत संयुक्त सर्वेक्षणाची सूचना आयुक्तांनी फेटाळली. यात मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाईल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रात्रीतून कारवाई नाही : आयुक्त
सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर तपोवनातील जागेत अतिक्रमणे उभी राहण्याचा धोका असल्याने २०१६ मध्ये झालेल्या महासभेत या जागेवर प्रदर्शनी केंद्र, ॲडव्हेंचर पार्क, धार्मिक केंद्र उभारण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानुसारच महापालिकेने प्रदर्शनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करत प्रदर्शनी केंद्र उभारण्यासाठी एकही झाड तोडले जाणार नसल्याचे तसेच रात्रीतून कुठलीही कारवाई केली जाणार नसल्याचे आयुक्त खत्री यांनी सांगितले.
तर साधुग्राम उभारायचे कोठे?
सिंहस्थ कुंभमेळा साजरा करण्यास आपला विरोध नाही मात्र, साधुग्राम वा प्रदर्शनी केंद्रासाठी तपोवनातील एकही झाड तोडू देणार नाही, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतल्याने आयुक्त खत्री यांनी संताप व्यक्त केला. तपोवनात तिन्ही प्रमुख आखाड्यांसाठी जर्मन शेड उभारावे लागणार असल्याने काही झाडे तोडावीच लागतील, असे स्पष्ट करत झाडे तोडायचीच नाही तर साधुग्राम उभारायचे कोठे, असा प्रतिसवाल आयुक्त खत्री यांनी केला.
साधुग्राम जागा बदलण्यावरून वाद
एकही झाड तोडू न देण्याची पर्यावरणप्रेमींची भूमिका असेल तर साधू-महंतांशी चर्चा करून साधुग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्या, अशी सूचना आयुक्तांनी पर्यावरणप्रेमींना केला. मात्र, साधू-महंतांशी चर्चा करण्याची जबाबदारी आमची नव्हे तर प्रशासनाचीच असल्याचे सांगत साधुग्रामची जागा बदलण्याची आमची मागणी नसल्याचे पर्यावरणप्रेमींनी ठामपणे सांगितले. प्रशासनाकडून मूळ मुद्दा भरकटवला जात असल्याचा आरोपही यावेळी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला.
प्रदर्शनी केंद्रासाठी एकही झाड तोडले जाणार नाही, असे आयुक्तांचे म्हणणे असेल तर वृक्षतोडीसाठी हरकती प्रशासनाने का मागविल्या?, सर्वेक्षण, वृक्षगणना, कुंभमेळा प्राधिकरणाची मंजुरी नसताना वृक्षतोडीचा आग्रह कशासाठी?, किती झाडे तोडणार याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. आंदोलन सुरूच राहणार, प्रशासनाने होमवर्क करून बैठक घ्यावी.
देवांग जानी, पर्यावरणप्रेमी
वृक्षतोडीच्या मुद्यावरून उडालेल्या गोंधळास महापालिका प्रशासनच जबाबदार आहे. संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी. किती झाडे तोडावी लागणार याची माहिती प्रशासनाला देता आली नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. चर्चेतून काहीही मार्ग निघू शकला नाही. साधुग्रामची जागा बदलण्याची आमची मागणी नाही.
अमित कुलकर्णी, पर्यावरणप्रेमी.
तपोवनात प्रदर्शनी केंद्र उभारण्यासाठी वृक्षतोड करण्यास आमचा विरोध आहे. प्रदर्शनी केंद्र औद्योगिक वसाहतीत उभारावे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनी केंद्र उभारण्यास स्थगिती देण्याची घोषणा केली असताना प्रशासनाची मात्र तशी भूमिका चर्चेतून दिसून आली नाही. प्रशासनाची भूमिका समन्वयाची नाही.
अंबरिश मोरे, पर्यावरणप्रेमी
साधुग्रामची उभारणी तपोवनातील आरक्षित जागेतच व्हावी. त्यासाठी काही झाडे हटविणे मान्य आहे. मात्र, तपोवनात प्रदर्शनी केंद्र न उभारता, ज्या कारणामुळे तपोवनाला महत्व आहे त्याला अनुसरून धार्मिक केंद्र उभारण्यात यावे. आर्ट गॅलरी, नक्षत्र वन, राशी वन उभारावे, भौगोलिक परिस्थिती कायम ठेवून विकास करावा.
शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी