नाशिक : तपोवन रोडवरील गोदामामध्ये राज्यात बंदी असलेला तब्बल 36 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन आणि भद्रकाली पोलिसांनी संयुक्त ही कारवाई केली असून, या प्रकरणी गोदाममालकाच्या चौकशीअंती साठा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकील मतीउल्ला अन्सारी (रा. पठाणपुरा, जुने नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित गुटख्याचा साठा करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासनास याबाबत माहिती मिळाली होती. तपोवन रोडवरील कोठावदे पेपर मिल भागातील पत्र्याच्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटख्याचा साठा केल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.7) सायंकाळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्ही. पी. धवड, अन्न सुरक्षा अधिकारी उ. रा. सूर्यवंशी, अ. अ. पाटील, यदुराज दहातोंडे, सुवर्णा महाजन यांच्यासह भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छापा टाकला.
गोदामाचे कुलूप तोडून पाहणी केली असता प्रतिबंध असलेल्या विविध प्रकारचा गुटखा आणि सुगंधी पानमसाल्याचा 35 लाख 96 हजार 940 रुपयांचा साठा मिळाला. गोदामाचे मालक हसमुख पोकार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर गोदाम संशयिताने भाडेतत्त्वावर घेतल्याचे समोर आल्याने मुद्देमाल हस्तगत करत सकीत अन्सारी विरोधात अन्नसुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी फिर्याद दिली आहे.