

नाशिक : शिंदेंची शिवसेना जिल्ह्याप्रमाणे शहरातही कमाल करेल, अशी शक्यता वाटत असतानाच ज्यांच्या खांद्यावर निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सोपवता आली असती असे सगळेच नेते त्यांच्या प्रभागात अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे या सर्व स्थानिक नेत्यांसमोर भारतीय जनता पक्षाने तगडे उमेदवार दिलेले असल्याने या नेत्यांना शंभर टक्के वेळ त्यांच्या प्रभागात देण्याशिवाय गत्यंतर नाही, असे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या नेत्यांच्या अन्य ठिकाणी असलेल्या अनुपस्थितीचा शिवसेनेला ठोस रणनीती आखताना नुकसान होऊ शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
भाजपसोबत युती होणार की, नाही होणार या प्रश्नाभोवती निवडणुकीपूर्वी चर्चा झडत असताना शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आणि महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हे सतत चर्चेत होते. बहुतांश विधानांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिले जात होते. युतीची शक्यता मावळल्यानंतर हे नेतेही आपापल्या प्रभागांमध्ये व्यस्त झाले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाने दिलेल्या उमेदवारांना चेतविण्याचे काम आता त्यांच्याकडून होताना दिसत नाही. पर्यायाने पक्षाच्या संभाव्य निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बोरस्ते आणि तिदमे यांच्या पाठोपाठ विलास शिंदे हेदेखील मूळ शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेसोबत आले. शहरभर प्रभाव असलेले विलास शिंदे हेदेखील सध्या त्यांच्या प्रभागात व्यस्त आहेत. शहराच्या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये त्यांचा वरचष्मा असताना स्वतःच्या प्रचारामुळे ते अन्य ठिकाणी वेळ देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
बोरस्ते, तिदमे, शिंदे यांच्याप्रमाणे नाशिकरोडमध्ये शिंदे सेनेचे अस्तित्व निर्माण करणारे सूर्यकांत लवटे आणि पाथर्डी तसेच सिडकोमध्ये बऱ्यापैकी प्रभाव असलेले अविनाश शिंदे आणि दीपक दातीर हेदेखील स्वतःच्या प्रभागात प्रचार करण्यात मग्न आहेत.
या महत्त्वाच्या नेत्यांच्या मुख्य प्रचारातील अनुपस्थिती पक्षाला अपेक्षित यश मिळवून देण्यात अडचणीची ठरू शकते, हे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. सध्या विविध कट्ट्यांवर तसेच काही ग्रुप्समध्ये या संदर्भातील चर्चा होताना दिसून येत आहेत.
नेत्यांची अनुपस्थिती; भाजपसाठी चांगली स्थिती
शिंदेंच्या शिवसेनेतील या नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे खास करून भाजपसाठी सध्या चांगली स्थिती निर्माण झाल्याचेही या निरीक्षकांचे म्हणणे आहे. प्रमुख विरोधी पक्षांपैकी उद्धव यांच्या शिवसेनेने हा धागा पकडून आपल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्रिय केल्याचेही चित्र शहरातील प्रभागांमध्ये सध्या दिसून येत आहे.