Flu Cases  
नाशिक

Swine Flu Nashik | ऐन सणासुदीत नाशिककरांवर स्वाइन फ्लूचे संकट; 3 आठवड्यांत 114 नवे रुग्ण, 11 जणांचा मृत्यू

Swine Flu Nashik | तीन आठवड्यांत 114 नवे रुग्ण; बाधितांची संख्या 261 वर

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ऐन सणासुदीच्या काळात नाशिक शहरासह जिल्ह्यासमोर स्वाइन फ्लूचे संकट उभे राहिले आहे. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येपाठोपाठ स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन आठवड्यांत शहरात स्वाइन फ्लूचे तब्बल ११४ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण बाधितांची संख्या २६१ वर पोहोचली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासून शहरात डेंग्यू, मलेरिया आणि तापसदृश्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आता स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे.

एच१एन१ इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा स्वाइन फ्लू हा श्वसनाशी संबंधित संसर्गजन्य आजार असून, बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या थेंबांद्वारे त्याचा प्रसार होतो. हवामानातील बदल आणि पावसाळ्यातील वाढलेली आर्द्रता यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत शहरात स्वाइन फ्लूचे अवघे सात रुग्ण आढळले होते. मात्र, जुलैपासून रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली. जुलैमध्ये २१, ऑगस्टमध्ये ११९, तर सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत ११४ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २६१ झाली आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गणेशोत्सवातील गर्दीमुळे संसर्ग वाढल्याची शक्यता

गणेशोत्सवाच्या काळातील मोठ्या प्रमाणावरील गर्दीमुळे स्वाइन फ्लूच्या संसर्गात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये या आजारामुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आणखी सहा मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महापालिका हद्दीतील तीन, ग्रामीण भागातील सहा, तसेच मालेगाव आणि सांगली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

डेंग्यूचेही 147 रुग्ण

स्वाइन फ्लू सोबतच डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूचे ५६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ऑगस्टमध्ये ४५, तर सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत आणखी ४६ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे डेंग्यूबाधितांची एकूण संख्या १४७ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे डेंग्यूमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया आणि मलेरिया यांसारख्या साथरोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT