नाशिक

Stray dog attack CIDCO : सिडकोत भटक्या श्वानांच्या हल्ल्यात जखमी लॉण्ड्री चालकाचा मृत्यू : परिसरात हळहळ

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे

पुढारी वृत्तसेवा

सिडको : खुटवडनगर परिसरातील पांडवनगरी येथे भटक्या श्वानांच्या टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लॉण्ड्री चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राजकुमार शंकर कनोजिया (वय ५३) यांचे शनिवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २५ जून रोजी ) पहाटे साडेपाचच्या सुमारास कनोजिया हे पांडवनगरी परिसरातून जात असताना भटक्या श्वानांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. श्वानांनी त्यांच्या पायांसह शरीराच्या विविध भागांवर चावे घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. नागरिकांनी प्रसंगावधान राखून श्वानांना हुसकावून लावत कनोजिया यांची सुटका केली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी महापालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, सिडको व खुटवडनगर परिसरात भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव लक्षात घेता नाशिक महानगरपालिकेने विशेष श्वान पकड मोहीम तातडीने राबवावी, अशी मागणी माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी मागणी केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT