Kalyan Crime : कल्याणच्या खडेगोळवलीत रक्तरंजित थरार! वडिलांना सोडून परतणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला

रुग्णालयात तरुणाची मृत्यूशी झुंज; परिसरात भीतीचे वातावरण
Crime News
File Photo
Published on
Updated on

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी-खडेगोळवली परिसरात गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे समोर आले आहे. वडिलांना दुकानात सोडून घरी परतणाऱ्या एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, तो सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोळसेवाडी परिसरात राहणाऱ्या या तरुणाचे नाव अद्याप समजू शकले नाही. पीडित तरुण आपल्या वडिलांना त्यांच्या दुकानात सोडण्यासाठी गेला होता. काम आटोपून परतत असतानाच, एका सशस्त्र टोळक्याने अचानक त्याला रस्त्यात गाठले. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी तरुणावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. भररस्त्यात झालेल्या या सशस्त्र हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे स्थानिक टोळीचा हात असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विठ्ठलवाडीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस या टोळक्यांवर नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे, मागील आठवड्यातच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खडेगोळवली परिसरात भेट देऊन उच्छाद मांडणाऱ्या टोळक्यांचा समाचार घेतला होता. मात्र, त्यानंतरही या भागात असा उन्माद सुरूच असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. परिसरातील अनेक तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची चर्चा असून, पोलिसांनी विठ्ठलवाडी-खडेगोळवली परिसरात आपला वचक निर्माण करण्यासाठी अधिक कठोर पावले उचलावीत, अशी मागणी संतप्त रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news