बाळाच्या पोटात अर्भक ! Pudhari File Photo
नाशिक

Medical Miracle | बाळाच्या पोटात अर्भक !

Medical Miracle | एसएमबीटीत पार पडली दुर्मीळ शस्त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मीळ मानली जाणारी 'फिटस इन फिटू' ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. अंजली चितळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका चिमुरड्याच्या पोटातील अविकसित अर्भकाचे अवशेष यशस्वीरीत्या बाहेर काढून त्याला जीवदान दिले.

दाखल एसएमबीटी येथे करण्यात आलेल्या एका बालकाला पोट फुगणे, सतत उलट्या आणि दूध न पचणे अशा तक्रारी होत्या. या प्राथमिक तपासणीत पोटात मोठी गाठ असल्याचे दिसून आले, मात्र, रेडिओलॉजिकल चाचणीत या बाळाच्या पोटातील रेट्रोपेरिटोनियम भागात एका दुसऱ्या अविकसित मानवी अर्भकाचे अवशेष असल्याचे निदान झाले.

ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, कारण त्या अर्भकाचा रक्तपुरवठा मुख्य बाळाच्या रक्तवाहिन्यांशी जोडलेला होता. एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी कौशल्याने बाळाच्या महत्त्वाच्या अवयवांना कोणताही धक्का न लावता हे अवशेष वेगळे केले. बाहेर काढलेल्या अवशेषांमध्ये पाठीचा कणा आणि हात-पायांची प्राथमिक रचना विकसित झाल्याचे दिसून आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. प्रखर नागर, डॉ. अनुप्रित सातपुते, डॉ. सविनय पाटील, डॉ. अनुज रंगम, डॉ. अश्रित राळे, डॉ. दिव्या सिंग, डॉ. प्रियांका खर्डे यांच्यासह बालरोग, भूल तज्ज्ञ, रेडिओलॉजी आणि पॅथॉलॉजी विभागातील सर्व तज्ज्ञांनी मेहनत घेतली.

शल्यचिकित्सक, कुशल भूल तज्ज्ञ आणि अहोरात्र सेवा देणारा प्रशिक्षित नर्सिंग व सपोर्टिंग स्टाफ यामुळेच अशा हाय-रिस्क केसेसमध्ये उत्तम यश मिळवणे शक्य झाले. अचूक निदानासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक सीटीस्कॅन, एमआरआय आणि जागतिक दर्जाचे ऑपरेशन थिएटर्स यांसारखी सर्व आधुनिक साधनसामग्री येथे एकाच छताखाली उपलब्ध आहे. - सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट

फिटस इन फिटू दुर्मीळ श्रेणी

'फिटस इन फिटू' ही स्थिती अत्यंत दुर्मीळ श्रेणीत येते. जागतिक आकडेवारीनुसार, दर पाच लाख जिवंत जन्मांमागे केवळ एका बालकात ही विसंगती आढळू शकते. १८ व्या शतकात पहिल्यांदा या स्थितीचे वर्णन झाले असून, आतापर्यंत संपूर्ण जगभरात अशा केवळ २०० पेक्षा कमी केसेसची अधिकृत नोंद झाली आहे. यामुळेच प्रत्येक केस ही वैद्यकीय संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

सामान्य रुग्णालयांमध्ये ज्या केसेस हाताळणे कठीण असते, अशा गुंतागुंतीच्या आणि दुर्मीळ वैद्यकीय केसेस यशस्वीरीत्या सोडवणे ही एसएमबीटी रुग्णालयाची ओळख आहे. शस्त्रक्रियेनंतर बाळ आता पूर्णपणे सुखरूप असून, त्याची प्रकृती आता सुधारत आहे.
- डॉ. अंजली चितळे, बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT