Citylink Bus Advertisement Scam file
नाशिक

Nashik Sinnar Citylink Bus | नाशिक-सिन्नर सिटीलिंक बससेवा ठप्प! चालकांवरील मारहाणीनंतर कडेकोट बहिष्कार; प्रवाशांचे हाल

Nashik Sinnar Citylink Bus | चालकांवरील मारहाणीच्या घटनांमुळे फेऱ्या बंद, प्रशासनाने तत्काळ तोडगा काढण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक सित्रर मार्गावरील सिटीलिंक बससेवा गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसह विशेषतः परीक्षा तोंडावर असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. चालकांवरील वाढत्या मारहाणीच्या घटनांमुळे या मार्गावर बस चालविण्यास चालकांनी नकार दिल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली सिटीलिक बससेवा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी महत्त्वाची वाहतूक सुविधा ठरली होती. नाशिक ते सिन्नर या मार्गावर दररोज सुमारे १२ ते १५ फेऱ्या होत होत्या.

मात्र, मागील काही काळात चालक-वाहक व प्रवासी यांच्यातील वाद, अनियमित थांबे आणि आसन व्यवस्थेवरून झालेल्या वादामुळे परिस्थिती चिघळली. काही ठिकाणी चालकांवर मारहाणीच्या घटनाही घडल्याने अखेर चालकांनी या मार्गावर बस नेण्यास नकार दिला. परिणामी १२ एप्रिलपासून ही सेवा पूर्णपणे बंद झाली आहे.

या बससेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून शहरात भाजीपाला वाहतूक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत होती. शहरातील महाविद्यालये, शाळा आणि अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त होती. मात्र, ही सेवा बंद झाल्याने विद्याथ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीयनि दखल घेऊन चालकांना सुरक्षा द्यावी आणि बससेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे हाल

सिन्नर व आसपासच्या ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी नाशिक शहरात शिक्षणासाठी येतात. सवलतीच्या दरात तीन ते सहा महिन्यांचे पास विद्यार्थ्यांनी घेतले आहेत. मात्र, बससेवा बंद असल्यामुळे त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत सिटीलिक प्रशासनाने पासची मुदत वाढवून देण्याची भूमिका घेतली आहे.

वारंवार वादांमुळे सेवा विस्कळीत

नाशिक - सिन्नर मार्गावर यापूर्वीही प्रवासी आणि चालक वाहकांतील वादांमुळे १५ वेळा बससेवा ठप्प झाली होती. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, ही परिस्थिती अजून किती दिवस राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मी पळसे येथून दररोज नाशिकला शाळेसाठी येतो. मासिक पास काढला आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून बसच येत नाही. खासगी गाड्यांतून कोंबून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आर्थिक नुकसान होतेच तर शाळेतही उशीर होतो.
-हर्षल गोहाणे, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT