नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चक्रतीर्थ बेझे येथील प्रस्तावित त्र्यंबकराजाच्या पंचमुखी मूर्ती प्रतिकृतीवर साधू-महंतांनी घेतलेला आक्षेप आणि त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षांना आसनव्यवस्थेत डावलल्याच्या आरोपावरून नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळा पूर्वतयारी बैठकीत शनिवारी (दि. १९) गोंधळ उडाला.
कुंभमेळामंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर त्र्यंबकराजाच्या प्रतिकृतीतच प्रशासनाने दर्शविलेली बदलाची तयारी आणि त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षांना कुंभमेळामंत्र्यांच्या शेजारी आसनव्यवस्था करण्यात आल्यानंतर अखेर या वादावर पडदा पडला. त्र्यंबकेश्वर परिसरातील बेझे येथील बेटावर त्र्यंबकराजाची पंचधातूची पंचमुखी ३१ फूट उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे.
या प्रस्तावित मूर्तीची प्रतिकृती प्रशासनाने बैठकीत ठेवली असता या प्रतिकृतीवर त्रिपुंड नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाकडून साधू-महंतांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप महंत हरिगिरी महाराज यांनी केल्याने बैठकीतील वातावरण तापले. तसेच याच वेळी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्या आसनव्यवस्थेवरूनही साधू-महंतांनी आक्षेप घेतला.
त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षांना दुय्यम स्थान देण्यात आल्याचा आरोप करीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासकामांच्या नियोजनात दुजाभाव केला जात असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने आसनव्यवस्था बदलून तुंगार यांना समोरील भागात स्थान दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले.
मात्र, त्र्यंबकेश्वरमधील हा वाद केवळ मूर्ती आणि आसनव्यवस्थेपुरता मर्यादित नसून, सिंहस्थाच्या विकासकामांच्या नियोजनातील समन्वयाचा मुद्दाही यामागे असल्याची चर्चा आहे. कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन हे भाजपचे, तर नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार या शिवसेना (शिंदे गट) च्या आहेत. विशेष म्हणजे २०२५ च्या नगर परिषद निवडणुकीत तुंगार यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्षपद मिळवले होते. त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोपही राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या कामांमध्ये नगर परिषदेला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार तुंगार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यामुळे विकासकामे, कार्यक्रमांचे नियोजन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग या मुद्द्यांवरून निर्माण होणारा विसंवाद पुन्हा बैठकीत समोर आला. साधू-महंतांनी त्र्यंबकेश्वरला नाशिकप्रमाणेच समान महत्त्व देण्याची मागणी केली.=
त्र्यंबकेश्वरसोबत दुजाभाव महंत हरिगिरीजी महाराज यांनी बेझे येथील पुतळ्याच्या प्रतिकृतीवर आक्षेप नोंदवला. त्याचप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून केलेल्या आसनव्यवस्थेनुसार आसनस्थ झालेले असताना ही बाब हरिगिरीजी महाराज यांना खटकली. त्यामुळे त्यांनी त्र्यंबकेश्वरसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप करीत याविषयी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आसनव्यवस्था बदलण्यात आली.- त्रिवेणी तुंगार, नगराध्यक्ष, त्र्यंबकेश्वर नगरपालिका