

कणकवली : राजापूर ते गोवा असे भाड्याच्या कारने जात असताना रविवार १३ सप्टेंबर रोजी रात्री महामार्गावर हुंबरठ येथे कारचालक रेहान इकबाल सय्यद (३२, रा. वाघुवाडी, राजापूर) याच्यावर चाकूने हल्ला करून पसार झालेल्या तिघांना कणकवली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासावरून नाशिक येथून जेरबंद केले. मद्यप्राशन स्थितीत असलेल्या या संशयितांना गाडीत सिगरेट ओढू दिली नाही, तसेच मध्ये कार थांबवली नाही, या रागातून त्यांनी रेहान याच्यावर हल्ला केल्याची कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली. तिघांना कणकवली न्यायालयात हजर केले असता २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
गौरव शिवाजी कासव (२४), गिरीश देवाजी जामदार (२४), विकास ज्ञानेश्वर पठाडे (२५ ,सर्व रा. अहिरखेडे ता. चांदवड जिल्हा नाशिक) अशी या संशयितांची नावे आहेत. हे तिघे संशयित गोव्यात फिरण्यासाठी रेल्वेने निघाले होते. मात्र, ते विनातिकीट प्रवास करत असल्याने त्यांना राजापूर येथे टीसीने उतरवले. त्यानंतर ते ऑटोरिक्षाने राजापूर बसस्थानकाकडे आले. रविवार १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा.च्या सुमारास राजापूर बसस्थानकानजीक रेहान इकबाल या स्विफ्ट कार चालकाशी त्यांची भेट झाली. त्यांनी राजापूर ते गोवा येथे जाण्यासाठी ४ हजार रुपये भाडे ठरवले व गोवा येथे जाण्यासाठी निघाले. महामार्गावर हुंबरठ येथे रात्री १० वा.च्या सुमारास लघुशंकेसाठी त्यांनी गाडी थांबवण्यास सांगितली.
गाडी थांबवल्यानंतर त्यांनी रेहानकडे गाडीची चावी मागितली; पण रेहानने त्यास नकार दिला. दरम्यान, वाटेत त्यांना गाडीत सिगरेट ओढू दिली नव्हती. या सर्व रागातून त्यातील एकाने रेहान याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने त्याच्यावर चाकूने वार केले, मात्र प्रतिकार करत रेहान गाडीतून बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. आरडाओरड केल्याने ते हल्लेखोर पळून गेले. मात्र, या हल्ल्यात रेहान गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या रेहानची आरटीओ अधिकाऱ्यांनी कणकवली पोलिसांना खबर दिली.
सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा काढला माग
त्यानंतर पोलिसांनी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या गुन्ह्याचा तपास कणकवलीचे पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शाखाली सुरू होता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासावरून या संशयितांचा माग काढत त्यांना नाशिक येथुन जेरबंद केले. पोलिस उपनिरीक्षक श्री. पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली टीमने ही कारवाई केली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पवार यांनी त्यांचा माग काढला.