पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामतीर्थ येथील गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघातर्फे गुरुवारी (दि. ११) सकाळी साधू संत-महंत, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, धार्मिक वातावरणात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा पार पडला. 'हर हर महादेव', 'गंगा गोदावरी की जय', 'जय श्रीराम आणि 'भारत माता की जय' अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण रामतीर्थ परिसर दुमदुमला होता.
या सोहळ्याला विविध संत, राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 4 सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यात १२ कोटींहून अधिक भाविक नाशिकमध्ये येण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने प्रशासन सज्ज होत आहे. मागील कुंभमेळ्यात नाशिकमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती.
या वेळीही तशीच कड़क खबरदारी घेतली जाईल. गेल्या ५० वर्षांत झाली नाही, एवढी नदीची स्वच्छता करण्यात आली आहे. सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्चुन नाशिकचा चेहरामोहरा बदलला जाईल. येथील विकासकामे पाहून लोक आश्चर्याने तोंडात बोटे घालतील. सिंहस्थाचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करताना नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, हा शिलान्यास सोहळा आगामी कुंभमेळ्याची सुरुवात आहे. दुष्प्रवृत्ती, अहंकार, मत्सर, मोह आणि द्वेष यांचा त्याग करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने कुंभमेळ्यातील गोदास्नान होय, असे ते म्हणाले. हा धर्मध्वज आखाडा परंपरा, साधू-संत, विज्ञान, पर्यावरण आणि मानवी मूल्यांची सांगड घालणारा असून, या ध्वजाखाली केवळ माणुसकी नांदते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
संजयदास महाराज यांनी सनातन धर्माच्या परंपरेचा उल्लेख करीत, धर्मध्वज हा प्राचीन परंपरेचे प्रतीक असून, शिलान्यास म्हणजे या महान कार्याचा पाया असल्याचे सांगितले. या ऐतिहासिक सोहळ्याला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, तसेच साधू-संतांच्या वतीने निर्मोही आखाडा,
निर्वाणी आखाडा दिगंबर आखाड्याचे राजेंद्रदास महाराज, माधवदास महाराज, ज्ञानदास महाराज, मुरलीधरदास महाराज आणि भक्तिचरणदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सिंहस्थ समितीप्रमुख, विश्वस्त सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल, प्रतीक शुक्ल, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभ प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि गंगा-गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे पदाधिकारी, नगरसेवक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविकांची अडचण
सोहळ्यासाठी रामतीर्थावर भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र, परिसरात सर्वत्र खोदकाम करण्यात आल्यामुळे भाविकांना बसण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नव्हती. अनेक भाविकांना सभोवताली खोदलेल्या सिमेंट आणि दगडांवरच बसून हा सोहळा पाहावा लागला. त्यामुळे पुढील कामांमध्ये भाविकांच्या सुविधेचा विचार व्हावा, अशी इच्छा भाविकांमधून व्यक्त होत होती.
सफाई कर्मचारी तैनात
ज्या गोदामाईच्या रामतीर्थात गाळ साचलेला दिसत होता, तिथे प्रशासकीय तत्परतेचे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सोहळ्यादरम्यान रामतीर्थाच्या पाण्यात एक फूल जरी पडले, तरी ते तत्परतेने बाहेर काढण्यासाठी सफाई कर्मचारी तैनात होते.