Mini Kumbh Mela : लघु कुंभमेळ्याने वाईत भक्तीचा महासागर

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : कृष्णाघाट परिसरासह अवघं शहर तल्लीन
Mini Kumbh Mela
लघु कुंभमेळ्याने वाईत भक्तीचा महासागर
Published on
Updated on

वाई : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई नगरीत नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत असून संपूर्ण कृष्णाघाट परिसर भक्तांनी फुलून गेला आहे. धार्मिक वातावरण, साधू-संतांचा वावर, आकर्षक रोषणाई आणि कृष्णा आरतीमुळे वाईनगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत आहे.

वाईच्या या लघु कुंभमेळ्यासाठी उज्जैन हरिद्वार हिमाचल प्रदेश गुजरात येथून नागा साधू विशेष दाखल झाले असून त्यांच्या उपस्थितीमुळे मेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. विविध धार्मिक विधी, होम-हवन, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि आरती सोहळ्यांमुळे भाविकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. नागा साधूंचे दर्शन घेण्यासाठी तसेच आशीर्वाद मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

पावसातही कृष्णाघाट परिसरात हजारो भाविकांनी उपस्थिती लावून धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. घाट परिसरातील मंदिरे, साधू-संतांचे दर्शन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या भक्तांची मोठी गर्दी झाली होती. मेळ्याच्या निमित्ताने संपूर्ण घाट परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. संध्याकाळी हरिद्वार व गंगा नदीच्या आरतीच्या धर्तीवर कृष्णा नदीची भव्य आरती होत असून ती या मेळ्याचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. दररोज तब्बल 20 ते 25 हजार भाविक उपस्थित राहत असल्याचे चित्र आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. अतुलबाबा भोसले, आ. मनोजदादा घोरपडे, आ. महेश शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे, वाई तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व वाई शहरातील नगरसेवक, सर्व आजी-माजी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी सुनील साळुंखे, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सुधीर वाळुंज, अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 200 ते 250 पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news