Nashik Shalarth ID Scam AI image
नाशिक

Shalarth ID Scam | शालार्थ आयडी घोटाळा : किरण कुँवरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आर्थिक अनियमितता आणि सरकारी तिजोरीवर पडलेल्या आर्थिक भाराची गंभीर दखल न्यायालयाने घेतली

पुढारी वृत्तसेवा

Kiran Kunwar Anticipatory Bail Rejected

नाशिक : सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण कुँवर यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा नाकारला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. या प्रकरणातील आर्थिक अनियमितता आणि सरकारी तिजोरीवर पडलेल्या आर्थिक भाराची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. दरम्यान, नाशिक पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासालाही न्यायालयाने महत्त्व दिले आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात २०२५ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात किरण कुँवर यांचा संशयित म्हणून समावेश आहे. नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सुनावणीदरम्यान तपासात समोर आलेल्या आर्थिक अनियमितता तसेच संबंधित संशयितांच्या भूमिकेवर न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदविले. या गैरव्यवहारामुळे शासकीय यंत्रणेवर आर्थिक भार पडल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आले.

या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरू असून, गुन्हे शाखेकडून संबंधित शिक्षण संस्थांची चौकशी केली जात आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, शालार्थ आयडीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात २३३ शिक्षण संस्थांमधील ८२१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप तपासात करण्यात आला आहे. आतापर्यंत १६ संशयितांची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली असून, संजय गडू आणि दीपक गडू यांना अटक करण्यात आली आहे.

सध्या पोलिसांकडून या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कथित बनावट कागदपत्रे तसेच संशयित नियुक्त्यांशी संबंधित बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT