नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत सातपूर पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.
या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच नागरिक, पत्रकार व सोशल मीडिया माध्यमांना अशा संवेदनशील सामग्रीचा प्रसार टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अशोक खरात प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून सुरू आहे. या प्रकरणातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे समोर आले.
२६ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास 'सिडको आणि सातपूर वॉलमन' या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सिद्धार्थ जी. रामोशे (मो. ७८४१०४०५२०) याने आठ अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यानंतर या ग्रुपवरील इतर अॅडमिन आणि सदस्यांनीही हे व्हिडिओ इतर व्हॉट्सप ग्रुपवर शेअर केल्याचे तपासात आढळून आले. यामध्ये रमीज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे, साहिल सय्यद यांच्यासह इतर अॅडमिन व सदस्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण संवेदनशील स्वरूपाचे असल्याने पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यावर पोलिसांचा विशेष भर आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी नागरिक, पत्रकार व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आवाहन केले आहे. कोणतीही माहिती तात्काळ डिलीट करावी व प्रसारित करू नये, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.