Broken Idol Restoration Nashik
अंजली राऊत
नाशिक : तुम्ही एखाद्या नदीकाठी, पिंपळाच्या झाडाखाली किंवा रस्त्याच्या एखाद्या कोपऱ्यात भग्न झालेल्या देवी देवतांच्या मूर्ती, फोटोफ्रेम नागरिकांकडून टाकून दिलेल्या बघितल्या असतील. अनेक महिनोनमहीने देवतांच्या मूर्ती, फोटोफ्रेम या तशाच पडूनच राहतात. त्यामुळे श्रद्धेचे स्थान असलेल्या मूर्तींची विटंबना होत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होते. याचाच विचार करत शहरातील संपूर्णम सेवा फाउंडेशनकडून अशा भग्न झालेल्या मूर्तींचे संकलन सुरू करण्यात येत आहे.
शहरातील संपूर्णम सेवा फाउंडेशन हे भग्न, जुन्या मूर्ती आणि धार्मिक वस्तूंचे पावित्र्य राखून त्यांचे विधीवत उत्तरपूजन व विसर्जन करण्याचे काम करत आहे. ॲड. तृप्ती गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील ही संस्था, या टाकाऊ वस्तूंपासून खते किंवा इतर पुनर्वापरयोग्य वस्तू बनवून पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक महिलांना रोजगार देण्याचे कार्य करत आहे.
शहरातील संपूर्णम सेवा फाउंडेशनने भग्न झालेल्या देवी-देवतांच्या मूर्ती संकलित करण्याची मोहीम हाती घेतली असून संस्थेच्या वतीने संकलित झालेल्या मूर्तीची विधिवत उत्तरपूजा केली जाते. तसेच प्लास्टिक, काचा, लाकडी वस्तूंचा देखील पुनर्वापर करत त्यातून खेळणी तयार केली जात आहेत. शहरात व शहराबाहेर घरी किंवा मंदिरात पूजेसाठी देवी-देवतांच्या मूर्ती-फोटो मोठ्या श्रद्धेने आणले जातात. अॅड. तृप्ती गायकवाड यांनी पुढाकार घेत संपूर्णम सेवा फाउंडेशनच्या वतीने भग्न झालेल्या मूर्ती, फोटो संकलित करण्याचे काम २०१९ मध्ये प्रारंभ करुन आज या उपक्रमाला सात वर्षे पूर्ण होत आहे.
संस्थेच्या जनजागृतीमुळे या मोहीमेस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील विविध ठिकाणावरुन गणेशोत्सव नवरात्रोत्सवानंतर भग्न झालेल्या देवांच्या मूर्ती अन् खराब फोटो मोठ्या प्रमाणात संकलित होतात. नागरिकांनी आपल्या घरातील भग्न मूर्तीची विटंबना टाळावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने केले जात आहे.
संपूर्णम सेवा फाउंडेशनच्या वतीने सुरू झालेल्या मोहिमेत शहरासह संपूर्ण भारतभराहून विविध ठिकांणावरुन जसे महाराष्ट्र, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, केरळ, मेरठ, अमृतसर असे सर्व ५०० ते ६०० स्वयंसेवक मोहीमेसोबत जोडले गेले आहेत. त्यांचे सर्वोत्तम योगदान लाभत असल्याने ही मोहीम आता देशपातळीवर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह देशभरातून मूर्तींचे संकलन होत असून पर्यावरणाचेही संवर्धन होण्यास मोठा हातभार लागत आहे.
जुने फोटोफ्रेममधील सर्व साहित्य वेगळे करुन पीयूपी, काच, लाकडी फ्रेम त्यामध्ये काही विशेष प्रॉडक्टचे मिश्रण करुन पुनर्वापरायोग्य साहित्यामधून हळूहळू नव्या साहित्याची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. यामध्ये मतिमंद मुलांना रोजगारदेखील उपलब्ध झाला, त्यांच्याकडून काही खेळणी, रंगकाम वगैरे सुरू करून घेण्यात आले. या साहित्याच्या पुनर्वापरामधून 'इनडोअर डेकोरेशन'च्या वस्तू, सापशिडी, लुडो, चेसबोर्ड, गार्डनमध्ये ठेवण्याकरीता बेंच, स्टूल, रांगोळीकरीता कोस्टर्स, मुलांची खेळणी, वॉल हँगिंग, कापडापासून आकाश कंदील, बेडशीट सजावटीच्या वस्तू अशा अनेक वस्तू साकारू लागल्या. हे सर्व करीत असताना त्याचे पावित्र्य भंग होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. भग्न मूर्ती आणि पूर्वजांचे काही जुने फोटो असे जमा झालेल्या साहित्याची सर्वप्रथम उत्तरपूजा केली जाते, जेणेकरुन कोणत्याही धार्मिक भावनांना ठेच पोहोचू नये आणि हिलिंगद्वारे पूजने केले जाते.
ज्यांना भग्न झालेल्या देवांच्या मूर्ती, जुने फोटो द्यायचे असतील त्यांनी ८८५०३२८२२५ या क्रमांकावर किंवा sampurnam2019@gmail.com येथे ई-मेल करुन अथवा https://www.sampurnam.org येथे संपर्क साधू शकतात. यासाठी माफक प्रमाणात प्रतीकिलोप्रमाणे खर्च असतो. त्यानुसार संस्थेद्वारे पोचपावती दिली जाते.
रत्नागिरी, बंगळूर, पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपतीसंभाजीनगर, अहिल्यानगर, नागपूर येथून उपक्रमासाठी मूर्ती संकलित झाल्या आहेत. आता पुढील १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे मुलूंड, कांदीवली, ठाणे, दादर, उल्हासनगर, कल्याण, चेंबूर येथील ठिकाणी मूर्ती संकलन करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
२०१९ मध्ये गोदावरी नदीकाठी एक व्यक्ती दोन-तीन जुने फोटोफ्रेम टाकायला आला होता. ५५० टनपेक्षा जास्त वस्तूंचा पुनर्वापर करण्यात आला आहे. नदी वा रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आलेल्या देवतांच्या मूर्ती-फोटोची अवहेलना थांबविण्याच्या दृष्टीने या उपक्रम राबविला जात असल्याने या माध्यमातून संकलित होणाऱ्या वस्तूचा पूर्नवापर करत पर्यावरण रक्षण होत आहे. भारतासह युएस, ऑस्ट्रेलिया, दुबई, कॅनडा येथून लोक कुरीसर करुन कस्टम ड्युटीचे पैसे आकारुन स्वयंस्र्फूर्तीने प्रतिसाद देत आहेत. नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे. त्यामुळे चळवळ अधिक व्यापक होईल.- ॲड. तृप्ती गायकडवाड, संस्थापिका, संपूर्णम सेवा फाऊंडेशन
२०१९ मध्ये संपूर्णम सेवा फाउंडेशनसोबत काम करत आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे भग्न झालेल्या देवांच्या मूर्तीची विटंबना होत नाही. जलप्रदूषण होत नाही, मूर्तींची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उपक्रम स्तूत्य असून माझ्या फ्रेंडसर्कलमध्ये कायम जनजागृती करत असतो. यातील साहित्याच्या पुनर्वापरामधून उपयोगी वस्तू सध्या तयार केल्या जात आहेत. नाशिकमध्ये पंचवटी, गंगापूर, नाशिकरोड, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, त्रिमूर्तीचौक, दत्तमंदिर, मेरी आरटीओ कॉर्नर असे संपूर्ण शहरात मोहीम राबविण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला जाणे शक्य नसते त्यामुळे लोकांनी स्वत:हून आम्हाला संपर्क साधावा असे आम्ही आवाहन करतो.- जय जोशी, स्वयंसेवक, संपूर्णम सेवा फाऊंडेशन, नाशिक
व्हॉट्सॲपवर २०२४ मध्ये एका फॉरवर्ड मेसेजमधून 'संपूर्णम सेवा फाऊंडेशन' द्वारे आयोजित केलेल्या 'मूर्ती संकलन मोहीम ड्राईव्ह' बद्दल माहिती मिळाली. जेव्हा मी माझ्याकडील वापरलेले धार्मिक साहित्य जमा करण्यासाठी तिथे गेले, तेव्हा त्यांच्या कामाबद्दल अधिक माहिती मिळाली. त्यांची संकल्पना मला खूप आवडली आणि त्यामुळे स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. धार्मिक श्रद्धांना धक्का न लावता संस्था काम करत असल्याने पर्यावरणाचेही रक्षण होत असल्याने दिलासा मिळतो.- रंजिता सहाणे, स्वयंसेवक, नाशिक