Nashik leopard news | १५ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, पण दुसरा शिकारी अद्यापही मोकाटच...

खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावावा, ग्रामस्थांनी मागणी
Nashik leopard news
Nashik leopard news
Published on
Updated on

नाशिक : गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या दोन बिबट्यांपैकी एक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. २९ मार्च रोजी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे हा बिबट्या अडकला. मात्र, त्याचा दुसरा साथीदार अजूनही मोकाट असल्याने ग्रामस्थांमधील भीतीचे सावट अद्याप कायम आहे.

पंधरा दिवसांपासून होती दहशत

लोहशिंगवे परिसरात दोन बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. माजी सरपंच संतोष जुंद्रे यांनी या संदर्भात वनविभागाकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत वनविभागाने रविवारी (२९ मार्च) निवृत्ती जुंद्रे यांच्या शेतात पिंजरा लावला. शिकारीच्या शोधात आलेला एक बिबट्या पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात अडकला.

वनविभागाची कारवाई

पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजेच्या सुमारास जेरबंद बिबट्याला सुरक्षितपणे नाशिक येथील केंद्रात हलवले आहे.

ग्रामस्थांची 'दुसऱ्या' पिंजऱ्याची मागणी

एक बिबट्या पकडला गेला असला तरी, परिसरात आणखी एक बिबट्या फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. "जोपर्यंत दुसरा बिबट्या जेरबंद होत नाही, तोपर्यंत धोका टळलेला नाही," असे मत संतोष जुंद्रे, शांताराम जुंद्रे, किरण जुंद्रे आणि भाऊसाहेब पाटोळे यांनी व्यक्त केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news