Nashik news | महाराष्ट्राचा रुस्तम-ए-हिंद नोकरीच्या प्रतीक्षेत

डबल महाराष्ट्र केसरी सदगीरच्या ऑलिम्पिक स्वप्नांना आर्थिक परिस्थितीचा अडसर
Nashik news | महाराष्ट्राचा रुस्तम-ए-हिंद नोकरीच्या प्रतीक्षेत
Published on
Updated on

जिजा दवंडे

नाशिक : ज्या खांद्यावर दोनदा मानाची महाराष्ट्र केसरीची गदा विसावली, त्याच खांद्यावर आज कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेचे मोठे ओझे आहे. स्वप्न तर ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविण्याचे आहे. त्यासाठी तयारीही सुरू झालीय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नोकरीचे आश्वासन दिले आहे, ते लवकर पूर्ण करावे, त्यावरच माझ्या कुस्तीचे भवितव्य अवलंबून असल्याची भावनिक साद डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने दैनिक 'पुढारी'च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला घातली आहे. खेळाडूंच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे दैनिक म्हणून सदगीर याने 'पुढारी'शी मनमोकळा संवाद साधला.

मूळचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोबाळे (ता. अकोले) येथील शेतकरी कुटुंबातील असलेल्या आणि प्रारंभी नाशिकमध्ये कुस्तीचे धडे गिरविलेल्या सदगीर याने नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आखाड्यातील प्रतिस्पर्ध्यांना चीतपट करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला आहे. दुसऱ्यांदा मिळविलेल्या या यशामुळे सदगीरचा आत्मविश्वास प्रचंड बळावला असून, आंतरराष्ट्रीय आणि ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविण्याचे स्वप्न त्याने बोलून दाखविले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या बलदंड मल्लाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आर्थिक संघर्षाशी कसे जिंकायचे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर असल्याची भावनाही त्याने बोलून दाखविली आहे. सदगीर याची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, अडीच-तीन एकर शेती आणि वडिलांच्या पगारावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

.. तर क्रीडा संस्कृतीचा पराभव

क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविल्यानंतरही अनेक खेळाडूंच्या नशिबी अवहेलना आणि दुर्लक्षितपणा आल्याचे समोर आलेले आहे. त्यातच आता डबल महाराष्ट्र केसरीसारख्या दिग्गज खेळाडूला जर आर्थिक हलाखीमुळे कुस्ती सोडावी लागली, तर तो महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीचा पराभव असेल, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सदगीरला नोकरी देऊन त्याच्या ऑलिम्पिकच्या स्वप्नांना अधिक बळ देण्याची गरज होत आहे.

शासनाची अनास्था की तांत्रिक अडचण?

२०१९ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर हर्षवर्धनला सरकारी नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पाच वर्षे उलटूनही आणि दुसऱ्यांदा (२०२६ मध्ये) गदा जिंकूनही त्याला अद्याप हक्काची नोकरी मिळालेली नाही. नोकरी मिळाली तर तो स्वप्न पूर्ण करेल; पण घराची परिस्थिती पाहता आता सराव करावा की, नोकरी शोधावी? असा उद्विग्न सवाल हर्षवर्धनने उपस्थित केला आहे.

हर्षवर्धन पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाला त्याचवेळी मंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. परंतु आतापर्यंत का नोकरी दिली नाही हे कळले नाही. आता अधिवेशन संपल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये नोकरी निश्चित केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. वास्तविक हर्षवर्धन हा आदिवासी भागातील असून, त्याची घरची परिस्थिती नाजूक आहे. त्यानंतर महाराष्ट्र केसरी झालेल्या शिवराज राक्षे याला पुणे महापालिकेमध्ये नोकरी लागली आहे. हर्षवर्धन हा राष्ट्रीय पदक विजेताही आहे.

- काका पवार, पुणे, (अर्जुन पुरस्कार प्राप्त तसेच हर्षवर्धनचे प्रशिक्षक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news