नाशिक : राज्य शासनाने ३० एप्रिलला जाहीर केलेल्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी डॉ. डी. एस. स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई शहर उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मालेगाव येथील अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांची जालना जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी सूरज गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांवर मोठी जबाबदारी येणार आहे.
सिंहस्थ २०२७ मध्ये होणार असला तरी त्याची पूर्वतयारी व ध्वजारोहण सोहळा २०२६ मध्येच होणार असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सक्षम नेतृत्वाची गरज होती. या पार्श्वभूमीवर शासनाने डॉ. स्वामी यांच्यावर विश्वास टाकला आहे. डॉ. डी. एस. स्वामी यांनी यापूर्वी नाशिकमध्ये पोलिस उपआयुक्त म्हणून काम करताना गुंडगिरीविरोधात विशेष मोहीम राबवून ठसा उमटवला होता.
सिंघम अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून ते यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक व ठाणे पोलिस आयुक्तालयात उपआयुक्त पदावर कार्यरत होते. दरम्यान, संवेदनशील मालेगावातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सूरज गुंजाळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.